![]()
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. शतकानुशतकांची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारामध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थानला एक लाखांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना यांना मिळाला. त्यांना ७५ हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी यांना मिळाला. त्यांना ५० हजारांचा धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा, समाज प्रबोधनातील दिंड्यांचे योगदान आणि स्वच्छ,निर्मल वारीच्या संकल्पनेचे कौतुक करत सर्व विजेत्या संस्थांचे अभिनंदन केले.वारकरी परंपरेतून समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या अशा उपक्रमांना राज्य शासनाकडून पुढेही प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वरदा (सध्याची वर्धा) नदीच्या तीरावरील श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे माहेर तसेच त्यांचे पिता भीष्मक राजांची प्राचीन राजधानी होते. प्राचीन काळी या तीर्थ क्षेत्राला कुंडिनपूर नावाने ओळखले जाईल. कालांतराने ते आता कौंडण्यपूर असे झाले आहे. कौंडण्यपूरला आषाढी एकादशीसह कार्तिक एकादशीलाही मोठी यात्रा भरते. हजारो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे येतात. विशेषत: कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत दररोज काकडा, तसेच विविध उत्सवांचे कार्यक्रम आयोजित केले जाते. ४३२ वर्षांपासूनची परंपरा माता रुक्मिणी यांची सुंदर चांदीची मूर्ती दींडीद्वारे एक महिना आधी अर्थात १९ जून रोजी कौंडण्यपूर येथून निघाली. कुऱ्हा, अमरावती, बडनेरा या मार्गाने होत ही दींडी नेहमीच्या परंपरेनुसार एक दिवस आधी पंढरपूरला पोहोचली. पंढरपूर येथे श्री रुक्मिणी मठ असून या मठात ही दींडी, पालखी सर्वप्रथम विश्रांती घेते. त्यानंतर विठूरायाचा दर्शनासाठी मंदिराकडे प्रस्थान करते. विशेष बाब अशी की, मार्गात दींडीतील वारकऱ्यांद्वारे स्वच्छता, समाज प्रबोधन, पर्यावरण पूरक कार्यक्रम घेतले जातात. ही देखील एक परंपरा आहे.
Source link
कौंडण्यपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानला प्रथम क्रमांक:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार2026'' प्रदान