Headlines

2500 दाखल्यांचे वितरण‎:अमरावतीच्या शाश्वत विकासावर अजित पवारांची छाप- आमदार संजय खोडके




प्रतिनिधी | अमरावती सरकारमध्ये राहून लोकनेते अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरवली, ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. या मतदारसंघाच्या विकासासाठी दादांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरिता भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळेच अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून विकासाच्या प्रत्येक पाऊलावर दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीप्रित्यर्थ येथे जनसेवा सप्ताह सुरु आहे. शोध प्रतिष्ठानद्वारा आयोजित या सप्ताहांतर्गत महाराजस्व अभियान व समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक भवनात आयोजित या शिबिराला आमदार सुलभा खोडके, मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर, महिला व बाल कल्याण सभापती ममता आवारे, नगरसेवक चंद्रकांत खेडकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, मीनल सवाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, मनपा आयुक्त मंगेश गोदावले, उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव (महसूल) व शिवाजी शिंदे (निवडणूक), मनपाचे उपायुक्त मनपा नरेंद्र वानखडे व भाग्यश्री बोरेकर, तहसीलदार विजय लोखंडे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिबिरात सुमारे २५०० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले. या महाराजस्व अभियानात आरोग्य सुविधा व योजना शिबिर, राशन कार्ड शिबिर, महसूल कागदपत्रे व दाखले वितरण, कामगार योजनांची माहिती, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना शिबिर, एस.टी. महामंडळ सवलतीच्या दरात प्रवासासाठी एन.सी. एम.सी. कार्ड शिबिर, आधार कार्ड केंद्र, पीआर कार्ड वाटप, पट्टे वाटप, सारथी, बार्टी, आर्टीच्या योजनांची माहिती, समाज कल्याण विभागाच्या योजना, दिव्यांग कल्याणच्या योजना आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. त्याआधारे अडीच हजार नागरिकांनी वेगवेगळे दाखलेही प्राप्त केले. आमदार सुलभा खोडके यांनी सर्व लाभार्थींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप केले. प्रास्ताविकादरम्यान उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी महाराजस्व अभियानाच्या आयोजनामागची रूपरेषा व्यक्त केली. सूत्रसंचालन समाज कल्याण विभागाचे श्रीकृष्ण पखाले यांनी केले. आभार नायब तहसीलदार श्रीकृष्ण गाडेकर यांनी मानले. शहरी अन्न व पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत, नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर, टिना चव्हाण, माजी महापौर रिनाताई नंदा आदींसह अनेक अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांसह, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या चित्रफीतही दाखवल्या प्रारंभी महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची शुभेच्छा चित्रफीत, लोकनेता दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारी चित्रफीत तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाबद्दल माहिती दर्शवणारी चित्रफीतही दाखवण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *