राज्यात टीईटी, पोलीस भरती आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असतानाच, आता थेट ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (MPSC) पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. MPSC मार्फत घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा
.
‘महाराष्ट्रातील पेपर लीकचा काळा अध्याय’ या नावाने पत्रकार परिषद घेत पवारांनी या कथित पेपरफुटीचे धागेदोरे, व्हॉट्सॲपवरील पुरावे आणि थेट MPSC च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास येत्या १० दिवसांत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नंदुरबार कनेक्शन आणि व्हॉट्सॲपचा खेळ
रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत पेपरफुटीची संपूर्ण कार्यपद्धती उलगडून दाखवली. त्यांच्या दाव्यानुसार, २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक पदाची परीक्षा होती. मात्र, नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतील काही विद्यार्थ्यांना २० मार्चलाच म्हणजेच दोन दिवस आधी परीक्षेतील ९० टक्के प्रश्न उपलब्ध झाले होते.
“पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सॲपवर प्रश्न पाठवायचा आणि दोन-तीन मिनिटांतच ‘डिलीट फॉर ऑल’ करायचा. मात्र, एका विद्यार्थ्याने ते डाऊनलोड केलेले प्रश्न आपल्या मित्राला पाठवले, ज्यामुळे या गैरव्यवहाराचे डिजिटल पुरावे आता आपल्या हाती लागले आहेत,” असा दावा रोहित पवारांनी केला आहे.
“पैसे देऊन आलेले अधिकारी प्रामाणिक काम करतील का?”
या कथित घोटाळ्याचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी जोडत पवारांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “पैसे देऊन, पेपर विकत घेऊन जर एखादा व्यक्ती ‘औषध निरीक्षक’ झाला, तर तो प्रामाणिकपणे काम करेल का? त्याचे पहिले टार्गेट गुंतवलेले पैसे वसूल करणे हेच असेल. काही दिवसांपूर्वी कफ सिरपमुळे २२ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा औषधांची तपासणी करण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर असते. भ्रष्ट मार्गाने आलेले अधिकारी जनतेच्या जीवाशी खेळ करणार नाहीत कशावरून?”
MPSC च्या अध्यक्षांवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
रोहित पवार यांनी केवळ पेपरफुटीचा आरोप केला नाही, तर MPSC मधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई वळवली. त्यांनी थेट काही प्रश्न उपस्थित केले:
सध्याचे MPSC अध्यक्ष कोणाच्या जवळचे आहेत? ते कोणाचे कॉलेज मित्र किंवा कोणाचे OSD होते? त्यांना आयोगात आणण्यासाठी नेमका कोणाचा आग्रह होता? याआधी परिवहन विभागात असताना ते कशासाठी ‘प्रसिद्ध’ होते? आयोगात बसवलेल्या व्यक्तींवर आता विश्वास राहिलेला नाही. मग ऑनलाइन परीक्षेचा घाट नेमका कशासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी घातला जात आहे?
‘कर्णिक घोटाळ्या’ची पुनरावृत्ती आणि १० दिवसांचा अल्टीमेटम
ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर तीव्र आक्षेप घेत, रोहित पवारांनी MPSC च्या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ‘ऑफलाइन’च घेण्याची ठाम मागणी केली. जर सरकारने आणि आयोगाने या पेपरफुटीच्या घोळाचा छडा लावला नाही, तर राज्यात मोठा ‘कर्णिक घोटाळा’ समोर आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
“MPSC ने हा घोळ शोधला नाही तर सरकारला हे खूप महागात पडेल. नीट परीक्षेच्या बाबतीत जे झाले ते सरकारने पाहिले आहे. त्यामुळे पुढील १० दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास आम्ही पुणे किंवा मुंबईत रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन उभारू,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा..
पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात

देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा