![]()
नीट परीक्षा, पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन हे पूर्णपणे स्वयंस्फूर्त असून शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत बदल व्हावेत, हीच त्यामागची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची, लाठीमाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागण्याची आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देशातील प्रत्येक कुटुंबात विद्यार्थी आहेत. त्यामुळे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची गरज सर्वांनाच वाटते. केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेतील बदलांसाठी नवीन विधेयक आणले असले, तरी त्याआधी विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने देशभर लागू होईल असा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचीही त्यांनी मागणी केली. ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अयोग्य’ दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरही वर्षा गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ही मुलं आपल्या देशाचं भविष्य आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणं योग्य नाही. त्यांना झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी,” असे त्या म्हणाल्या. मुंबईतील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींचे कपडे फाटल्याच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. ‘गुन्हे कायम राहिल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम’ आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यास त्यांच्या भविष्यातील शिक्षण आणि नोकरीच्या संधींवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता गायकवाड यांनी व्यक्त केली. परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अशा गुन्ह्यांचा फटका बसू शकतो, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे एकाच निर्णयाद्वारे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीवर प्रश्नचिन्ह शिक्षण व्यवस्था ही सातत्याने सुधारणा करण्याची प्रक्रिया असल्याचे सांगत वर्षा गायकवाड यांनी पेपरफुटीच्या वाढत्या घटनांवरही चिंता व्यक्त केली. एमपीएससी, टीईटी आणि इतर परीक्षांमधील गैरव्यवहारांचा उल्लेख करत त्यांनी पेपर तयार होण्यापासून विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी गळती होत असल्याचा आरोप केला. “विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन केलं की त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. ही लोकशाहीसाठी योग्य परंपरा नाही,” असे त्या म्हणाल्या. ‘पोलीस जनतेचे सेवक, सरकारचे नाही’ आंदोलनांदरम्यान पोलिसांच्या भूमिकेवरही वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले. पोलीस हे सरकारचे नव्हे तर जनतेचे सेवक आहेत. शांततेने आंदोलन करणाऱ्यांना उचलून नेणे, ध्वनिक्षेपक जप्त करणे किंवा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीला धरून नसल्याची टीका त्यांनी केली. सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून नोटिसा दिल्या जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला. संसदेत या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांवरील लाठीमार, त्यांच्यावरील गुन्हे आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली. हेही वाचा.. पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा
Source link
विद्यार्थ्यांची माफी मागा, गुन्हे मागे घ्या:काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, लाठीमार प्रकरणावरही संताप