महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेला वेग आला असून, मतदारांना येत्या 8 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणना अर्ज भरून संबंधित बीएलओंकडे (BLO) जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी केले
.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पत्रकाद्वारे मतदारांना आवाहन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रम चालू असून त्यानुसार सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी दि. 08.08.2026 या दिनांकापर्यंत गणना अर्ज भरुन गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे द्यावयाची आहेत. गणना अर्ज भरुन व त्यावर स्वाक्षरी करून दिलेल्या मतदारांची नावे दिनांक 17.08.2026 रोजी प्रसिध्द होणाऱ्या प्रारुप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील.
16 सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी
ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाहीत किंवा जे नव मतदार असतील त्यांना दिनांक 17.08.2026 ते दि. 16.09.2026 या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडुन सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा 8 भरु शकेल.

19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी होणार जाहीर
तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकत घेऊ शकेल. मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा/विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते. अंतिम मतदार यादी दिनांक 19.10.2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
अंतिम यादीनंतरही नोंदीमध्ये सुधारणा करता येणार
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1950 च्या कलम 22 व 23 मधील तरतुदीनुसार अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार यादीमधील नोंदीमध्ये सुधारणा करता येते किंवा नाव समाविष्ट करता येते. सबब, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र व्यक्तीस आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विहीत नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation) आहे व व कलम 23 (3) नुसार अशा सुधारणा कोणत्याही निवडणुकांसाठी नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत करता येतात, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कालिंगम यांनी केले आहे.