![]()
राज्यात एका बाजूला अनेक भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई, कोकण, पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला मोठा फटका बसत असून, सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरड कोसळल्याने रस्त्यावर दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या घटनास्थळी ‘सह्याद्री ट्रेकर्स’ आणि प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हा ढिगारा हटवण्याच्या कामादरम्यान एक जेसीबीही या दरडीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडे तातडीने अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सातारा-महाबळेश्वर मार्गावरील प्रवास टाळावा, असे महत्त्वाचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नेरळ-माथेरान घाटात पर्यटकांच्या कारला अपघात; सुदैवाने चारही प्रवासी बचावले रायगड जिल्ह्यातील नेरळ-माथेरान घाटात पर्यटकांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. उल्हासनगर येथून माथेरानला फिरायला आलेले पर्यटक सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाले असताना, घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार थेट रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या थरारक घटनेत कारमधील चारही प्रवासी थोडक्यात बचावले असून, ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Source link
सातारा-महाबळेश्वर मार्गावर महाकाय दरड कोसळली:जेसीबीही दरडीत अडकला, वाहतूक पूर्णपणे ठप्प; प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू