![]()
हिंगोली येथील बसस्थानकावर सापडलेल्या मृतदेहावर शासकिय रुग्णालयात बुधवारी ता. १५ उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत वाढत्या तापमानाचा पहिला बळी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बसस्थानकावर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आज पहाटेच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार संजय मार्के, शेख अमजद, ज्ञानेश्वर काळे, शेख महम्मद यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला होता. या शिवाय मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणे सुरु होते. दरम्यान, सोशल मीडियावर मृतदेहाचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली असून सदर मृतदेह शेख रफीक शेख उस्मान (३०, रा. अनसिंग, ह. मु. जवळा बुद्रक) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांचे नातेवाईक हिंगोलीत दाखल झाले. मयत शेख रफीक यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी झाल्यानंतर उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत शेख रफीक हे दोन दिवसांपुर्वी मुलांना सोडण्यासाठी हिंगोलीत आले होते. त्यानंतर ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुबियांनी शोध सुरु केला होता. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. हिंगोली शहराचे तापमान मागील दोन दिवसांपासून चांगलेच वाढले असून एप्रील महिन्यातच ४२ डिग्री तापमान झाले आहे. त्यामुळे सकाळी ११ नंतर शहरात शुकशुकाट जाणवत आहे.
Source link
हिंगोलीत उन्हाचा पहिला बळी:30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बसस्थानकावर सापडला होता मृतदेह; 'पोस्टमॉर्टम'मध्ये उष्माघाताचे निदान