![]()
अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे विशेषत: टरबुजाच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली. मात्र, रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने संपूर्ण पीक वाया गेले. या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या खारोडे यांनी भावनिक होत आपली व्यथा मांडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन देत वेळेनुसार नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे मान्य केले. या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत ते लिंबाच्या झाडावरून खाली उतरले. यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यानंतर महावितरणची यंत्रणा अगदी दक्ष झाली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून यापुढे वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले असून तसे लेखी पत्रसुद्धा अधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे.
Source link
टरबूज पिकाचे नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतरच शेतकरी झाडावरून खाली उतरला, अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचे पत्र