![]()
नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषनगर परिसरातील आश्रय सोसायटीजवळ एका भरधाव कारने तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात प्राण गमावलेल्या तीन वर्षीय चिमुरड्याचे नाव श्रीअंश पंकज आष्टणकर असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी श्रीअंश हा आपल्या वडिलांसोबत एका दुकानात गेला होता. तो दुकानाच्या आवारात खेळण्यात मग्न होता. मात्र, खेळता-खेळता तो अचानक मुख्य रस्त्यावर (सिमेंट रोडवर) पोहोचला आणि नेमक्या याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्याला उडवले. कारची धडक इतकी जोरदार होती की, यात श्रीअंश गंभीररीत्या जखमी झाला. अपघातानंतर घाबरलेले कुटुंबीय आणि तेथे उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने उपचारांसाठी जवळच्या तायवाडे रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य पाहून तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी मेडिकल रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, मेडिकल रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून या चिमुरड्याला मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत कारचालक हर्षद वहाणे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना!:भरधाव कारच्या धडकेत 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, चालकाला अटक