Headlines

युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे:‘चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटर'' शुभारंभाप्रसंगी तहसीलदार चावडे यांचे प्रतिपादन‎




रोजगारनिर्मितीसाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी प्रयत्न होणे आवश्यक असून, युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी चावडीसारख्या संस्था देत असलेले मार्गदर्शन व प्रशिक्षण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग व उद्योग उभारणीचे प्रशिक्षण देणाऱ्या चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरच्या नाशिक जिल्ह्यातील पहिल्या शाखेचा शुभारंभ सटाण्यात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. येथील रामजी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, मुख्याधिकारी ज्योती भगत, शेतकरी मित्र बिंदू शर्मा, दोधेश्वर देवस्थानचे महंत हरी ओमआनंदपुरी महाराज, बाजार समितीचे माजी सभापती भिका सोनवणे, पोलिस निरीक्षक सुनील वसावे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी देवमामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड होते. कामाच्या व्यस्ततेमुळे आमदार दिलीप बोरसे यांनी कार्यालयास भेट देत शुभेच्छा दिल्या. रामजी मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात चावडी समूहाचे संस्थापक अमित मखरे यांनी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांची माहिती दिली. शेतीपूरक उद्योग, दुग्धव्यवसाय, प्रक्रिया उद्योग, घरगुती व्यवसाय, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, महिला बचत गटांसाठी उद्योग उभारणी, व्यवसाय नियोजन, शासकीय योजनांचे मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विकास अशा विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांना स्वावलंबी बनविणे हा चावडीचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भालचंद्र बागड यांनी तालुक्यातील एमआयडीसीचा बोर्ड भंगार झाला परंतु एमआयडीसी निर्माण होत नसल्याची खंत व्यक्त करत चावडीच्या माध्यमातून तरी बागलाणमध्ये नव्या उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक चावडी सटाणा शाखेचे व्यवस्थापक रमेश देसले यांनी केले. सूत्रसंचालन शशिकांत कापडणीस यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील १२५ मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *