![]()
पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे सभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी नगरसेवकांनी ‘वेल’मध्ये प्रवेश केला. त्यांनी हातात ‘रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता?’, ‘पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत’, ‘खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे’ आणि ‘रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे गटनेते काका चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)चे गटनेते नितीन गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी सहभाग घेतला. नगरसेवकांनी शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप केला. पावसामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे दररोज अपघात घडत आहेत. वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचा वाढता मनस्ताप याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी तातडीने सर्व खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. वारंवार तक्रारी करूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने सभागृहात आंदोलन करण्याची वेळ आल्याचे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, खड्डेमुक्त पुण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा आणि नागरिकांना सुरक्षित रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे काही काळ कामकाज ठप्प झाले. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभेच्या नियमित कामकाजाला सुरुवात करण्यात आली. शहरातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या सभागृहात केंद्रस्थानी आल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.
Source link
पुणे मनपा सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांवरून गदारोळ:विरोधी नगरसेवकांनी फलक घेऊन प्रशासनाचा निषेध केला