Headlines

गोपनीय माहितीची सुरक्षा भविष्यात मोठे आव्हान:सायबर तज्ञांचे मत; हल्ले रोखण्यासाठी AI चा वापर आवश्यक




बदलत्या काळानुसार सायबर हल्ल्यांचे आणि गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. आता केवळ आर्थिक लाभासाठीच नव्हे, तर गोपनीय माहितीच्या चोरीसाठीही मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले होत आहेत. यामध्ये वैयक्तिक माहितीपासून ते देशासाठी महत्त्वाच्या माहितीच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचे भविष्यात सायबर क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे, असे मत सायबर तज्ञांनी व्यक्त केले. ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागात ‘इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास’ सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सायबर तज्ञांनी भविष्यात गोपनीय माहितीचे संरक्षण कसे करावे, यावर प्रशिक्षण दिले. ज्येष्ठ सायबर तज्ज्ञ अमलेश मेंढेकर आणि कुणाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. ट्रान्सेडेंटल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख केतन अत्रे यावेळी उपस्थित होते. अमलेश मेंढेकर यांनी सांगितले की, वैयक्तिक वापरापासून ते देशाच्या संरक्षण क्षेत्रापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याच प्रमाणात सायबर हल्ल्यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या जगात दर ३९ सेकंदांनी एक यशस्वी सायबर हल्ला होतो. तसेच, ५ लाख ६० हजार मालवेअर सॉफ्टवेअर तयार होऊन सायबर हल्ले केले जात आहेत. सायबर हल्ल्यांची ही वाढती व्याप्ती पाहता, त्यांना सामोरे जाण्यासाठी पारंपरिक पद्धती अपुऱ्या पडतील. सायबर हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर वाढवणे तितकेच आवश्यक आहे. मेंढेकर पुढे म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कमांड देण्यासाठी पूर्वी कोडिंगचे ज्ञान आवश्यक होते, परंतु आता रोजच्या वापरातील भाषेतही AI सोबत संवाद साधणे शक्य झाले आहे. यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आणि त्यांची क्लिष्टता दोन्ही वाढत आहेत. अशा परिस्थितीत हे गुन्हे सोडवण्यासाठी अधिक तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. कुणाल पाटील यांनी सांगितले की, आज तपास यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. तसेच, त्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि साधनांची कमतरता जाणवते. सायबर गुन्ह्यांचा तपास करताना हा एक मोठा अडथळा आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आधुनिक प्रशिक्षण सातत्याने होत राहणे गरजेचे आहे. सायबर क्षेत्रात गुन्हेगार आणि तपास यंत्रणा यांच्यात मोठी तफावत दिसून येते. जेव्हा एखादा सायबर गुन्हा उघडकीस येतो, त्यापूर्वी किमान सहा महिने ते एक वर्ष गुन्हेगाराने त्या संदर्भात काम सुरू केलेले असते, जेव्हा गुन्हा उघडकीस येतो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानही बदललेले असते, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *