Headlines

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अभयारण्य, टिश्यू कल्चर प्रयोगशाळा:वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; वनविकासासाठी सीएसआरवर भर




वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अभयारण्य आणि आधुनिक टिश्यू कल्चर प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या घोषणेनुसार ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रयोगशाळा कोकणातील शहापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि जळगाव येथे उभारल्या जातील. यासोबतच, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक अभयारण्य निर्माण करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. नाईक हे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) वन विभागाद्वारे आयोजित परिषदेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनीवास राव उपस्थित होते. कंबोडिया, भूतान आणि बांगलादेशातील प्रतिनिधीही या परिषदेला हजर होते. या परिषदेत वनविभागाच्या विविध योजना, यश आणि उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘वाटचाल वनविभागाची’ या विशेष पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. वनविकासाला गती देण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) माध्यमातून निधी उभारण्यावर वनमंत्र्यांनी विशेष भर दिला. शासकीय जंगलांचा विकास कॉर्पोरेट क्षेत्राच्या हाती देण्याचा विचार मांडताना, “५० उद्योजक मी स्वतः उभे करतो, इतरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून संबंधित राखीव किंवा संरक्षित जंगलाला त्यांचे किंवा त्यांच्या घरातील व्यक्तीचे नाव देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात सभागृहात शहर, सीएसआर प्रतिनिधी, व्यावसायिक, नोकरदार, राजकारणी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. मात्र, प्रत्यक्ष जंगल वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते, शाळकरी मुले, तरुण, ग्रामस्थ आणि ग्राम विकास परिस्थितिकी समितीचे अध्यक्ष या चर्चेपासून दूर राहिले. सभागृहाबाहेर आदिवासी कोरकू नृत्य करणारा एक गट उभा होता, परंतु मुख्य व्यासपीठ आणि निर्णयप्रक्रियेत स्थानिक घटकांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *