![]()
अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित करिअर संसद शपथविधी सोहळ्यात श्री संकल्प मीडिया सोल्युशनचे संचालक डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. त्यांनी पदवी घेऊन न थांबता स्वतःच्या कल्पना, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्योजक बनण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. महाविद्यालयाच्या सर सी.व्ही. रमण सभागृहात ‘करिअर संसद शपथविधी आणि यशस्वी उद्योजकांशी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे होते. प्रमुख अतिथी म्हणून आयक्यूएसी समन्वयक डॉ. संगीता इंगोले, पी.एम. उषा प्रकल्प समन्वयक डॉ. मनीष गायकवाड आणि जिल्हा करिअर कट्टा समन्वयक डॉ. रेखा मग्गीरवार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ‘करिअर कट्टा’ हा उपक्रम चालवला जातो. या अंतर्गत दरवर्षी करिअर संसदेची स्थापना केली जाते. यावर्षी निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना याच कार्यक्रमात पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. “यशस्वी उद्योजकाशी प्रेरणादायी संवाद” या विशेष सत्रात डॉ. मनीष गायकवाड यांनी डॉ. चंद्रकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी यशस्वी उद्योजक बनण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामध्ये ठाम निश्चय, संपूर्ण तंत्राचे व व्यवसायाचे सर्वांगीण ज्ञान आणि योग्य ग्राहक वर्ग निवडणे या बाबींचा समावेश होता. बाजाराची निवड आणि मार्केटिंगची माहिती असणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. करिअर कट्टाच्या समन्वयक डॉ. रेखा मग्गीरवार यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणातून या उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता वाढीसाठी त्याचे महत्त्व विशद केले. डॉ. मयुरा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. उज्ज्वला जुनघरे यांनी करिअर संसदेच्या शपथविधीचा मसुदा वाचला. डॉ. अनुराधा राजोरिया यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
Source link
रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना:डॉ. चंद्रकांत शिंदे यांचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन