![]()
महापालिकेने मोठ्या विश्रांतीनंतर शहराच्या बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी व बुधवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कापड बाजार, शहाजी रोड, तेलिखुंट, गंज बाजार येथील रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करून साहित्य जप्त केले. बाजारपेठेतील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. विशेषतः एम.जी.रोड, शहाजी रोडवर हातगाडी विक्रेते व पथारी व्यावसायिक रस्त्यावरच स्टॉल लावून व्यवसाय करत आहेत. बाजार पेठेत आधीच पार्किंगची मोठी समस्या आहे. अशातच या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला जात आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. अतिक्रमणांमुळे वाहने लावण्यास अडथळे येतात व त्यामुळे वाहन चालक जागा मिळेल तिथे वाहने लावतात. या सर्व समस्येमुळे महापालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेत मोचीगल्ली, गंज बाजार व शहाजी रोडवर असलेल्या हातगाड्या हटवण्यात आल्या. दुकानाबाहेर लावलेले बोर्ड, साहित्य हटवण्यात आले. काही साहित्यही जप्त करण्यात आले. यापुढेही मोहीम सुरू राहणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. अतिक्रमणांवर कारवाईसाठी कायमस्वरूपी पथके आवश्यक वारंवार कारवाईनंतरही अतिक्रमणाची समस्या कायम आहे. विशेषतः बाजारपेठेतील रस्त्यावर होणारी अतिक्रमणे टाळण्यासाठी या भागात कर्मचाऱ्यांची पथके कायमस्वरूपी नियुक्त करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांची पथके नियुक्त केल्यास अतिक्रमणे होण्यापूर्वीच त्यांना हटवणे शक्य होईल. तसेच, पोलिस प्रशासनानेही कायद्याचा वापर करून वाहतुकीला अडथळा करणाऱ्या पथारी व्यावसायिक व हातगाडी विक्रेत्यांना हटवल्यास वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. यापूर्वी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर हा प्रयोग करण्यात आला होता. त्याला यशही आले होते. तसाच प्रयोग कायमस्वरूपी केल्यास अतिक्रमणाची समस्या सुटण्यास मदत होईल.
Source link
अहिल्यानगर:बाजारपेठेत पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम