![]()
दिल्लीतील जंतर-मंतरवर रंगलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलन काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांडे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मुक्कामाला होते, अशी माहिती उघडकीस आल्याने राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अभिजित दिपके यांना आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांना विचारले असता, अनिश माझा मित्र असल्याचे सांगितले. या मागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्टीकरणही दिले. मात्र, ऐन आंदोलनाकाळीत ही घडामोड आता आंदोलन यशस्वी झाल्यानंतर चांगलीच चर्चेत आली आहे. नेमके प्रकरण काय? कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू केले. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनाला पाठिंबा देत सोनम वांगचुक ही मैदानात उतरले. वांगचुक यांनी 26 दिवसांनी मागण्या मान्य झाल्याचे सांगत उपोषण सोडले. मात्र, दिपकेंनी आपला लढा सुरूच ठेवला. या दरम्यान शरद पवार यांनी दिपकेंची भेट घेतली. तर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याचे समोर आले. या गाठीभेटीमुळे संपूर्ण घडामोडींमागे काय रणनीती होती, याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. कडवट टीकेनंतरचा गोडवा खरे तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांना राजकीय स्थैर्याला हानी पोहचवणारी ‘भटकती आत्मा’ म्हटले होते. तर 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांदरम्यान मोदींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘नॅचरली करप्ट पार्टी’ (नैसर्गिकरित्या भ्रष्ट पक्ष) म्हणत जनतेला ‘काका-पुतण्या’च्या (शरद पवार आणि अजित पवार) जोडीला सत्तेतून खाली खेचण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही शरद पवार हे राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि वैयक्तिक संबंध वेगळ्या ठिकाणी म्हणत मोदींच्या जवळ आल्याचे अनेकदा दिसले. दिपकेंचा तो मुक्कामही यामुळेच चर्चेत राहिला आहे. यामुळे नेहमी होते चर्चा नरेंद्र मोदींनी 2015 मध्ये बारामती दौऱ्यादरम्यान सार्वजनिकरित्या शरद पवारांच्या दीर्घ राजकीय अनुभवाची प्रशंसा करत पवारांनी राजकारणाच्या सुरुवातीच्या दिवसांत हात धरून चालायला शिकवल्याचे म्हटले होते. राजकीय मतभेद असूनही मोदी सरकारने 2017 मध्ये शरद पवारांना देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित केले होते. शरद पवार हे देशातील मोजक्या विरोधी नेत्यांपैकी एक मानले जातात, ज्यांचा पंतप्रधानांशी थेट संपर्क आहे. ते राष्ट्रीय मुद्द्यांवर किंवा महाराष्ट्रातील प्रशासकीय संकटांवर अनेकदा पंतप्रधान मोदींशी वन-टू-वन भेट घेतात. ही सर्व कारणे पाहता दिपके-पवार भेट आणि पवार-मोदी यांची भेट यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. “मित्र म्हणून थांबलो होतो!” – दिपकेंचे स्पष्टीकरण या वादावर पडदा टाकताना अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, “अनिश गवांडे हा माझा जुना आणि जवळचा मित्र आहे. एका मित्राच्या नात्याने मी त्याच्या घरी थांबलो होतो, यात कोणताही राजकीय हेतू नाही. पवार साहेब आणि पंतप्रधान मोदी फार मोठे नेते आहेत. जंतर-मंतरवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची दखल घेण्यासाठीच पवार साहेब आम्हाला भेटायला आले होते आणि माझी त्यांची ही पहिलीच भेट होती.”
Source link
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर नवा राजकीय ट्विस्ट!:NCP शरद पवारांच्या राष्ट्रीय प्रवक्त्याच्या घरी अभिजित दिपकेंचा आश्रय