![]()
संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी ‘हास्ययोग’ म्हणजे जीवनातील आनंद आणि दुःख या दोन्ही परिस्थितीकडे समबुद्धीने पाहण्याची ‘स्थितप्रज्ञ अवस्था’ असल्याचे मत व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटलतर्फे आयोजित गुरुपौर्णिमा – गुरु सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुण्यातील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन एकबोटे, हास्य क्लब प्रणेते विठ्ठल आणि सुमन काटे तसेच सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते डॉ. सतीश देसाई यांना ‘गुरु सन्मान’ प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, उद्योजक प्रकाश धोका, श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे सीओओ डॉ. तुषार खाचणे आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त जयंत दशपुत्रे उपस्थित होते. मकरंद टिल्लू यांनी सन्मानार्थी गुरूंचे अंतरंग उलगडले. डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले की, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हास्ययोग चळवळ अत्यंत आवश्यक आहे. संत परंपरेपासून साहित्याच्या विविध प्रवाहांमध्ये विनोदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. संत एकनाथ महाराज यांच्यासारख्या अनेक संतांनी सामाजिक जीवनातील विरोधाभास टिपताना आणि रूढी-परंपरेतील ढोंगीपणा लक्षात आणून देण्यासाठी विनोदाचा खुबीने उपयोग केला. योगशास्त्रात कर्म, ज्ञान आणि भक्ति योग सांगितले असले तरी, हास्याला देखील योगाइतकेच महत्त्व आहे हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. ही हास्यचळवळ आता केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून, तिचे फायदे लक्षात आल्याने ती भारताबाहेरही विस्तारली आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवाराने हास्ययोगाला जागतिक मान्यता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. राजे राजवाड्यांच्या काळात देखील राज्याचा कारभार चालवताना प्रचंड ताण असल्याने तो ताण काहीसा हलका व्हावा, म्हणून विदुषकाची नेमणुक केली जायची. हास्ययोग हा केवळ हास्या पुरता मर्यादित नसून जीवनाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन त्याव्दारे मिळतो.
Source link
हास्ययोग म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था:नवचैतन्य हास्ययोग परिवार गुरुपौर्णिमा सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन