![]()
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवी दिल्ली येथील ‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने ३० जुलै २०२६ रोजी एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या ६ ते २४ तासांत संबंधित पाणलोट क्षेत्रात १२४ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. यामुळे स्थानिक ओढे, नाले आणि लहान नद्यांच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील काही तास अत्यंत सतर्क राहावे आणि अनावश्यकपणे सखल भाग किंवा नद्यांच्या पात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे ‘लँड सरफेस मॉडेल’नुसार या भागांतील जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता तब्बल ९८ टक्क्यांपर्यंत संपृक्त झाली आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या अतिरिक्त पावसाचे पाणी जमिनीत न मुरता थेट पृष्ठभागावरून जलद गतीने वाहून सखल भागांमध्ये अचानक पूर आणू शकते. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर आणि मुंबईसह भोपाळ, अहमदाबाद तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागांना तातडीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे स्थानिक ओढे, नाले, लहान नद्या आणि पुलांवरून पाण्याचा प्रवाह अचानक वेगाने वाढू शकतो. नागरिकांसाठी काही तातडीची नियमावली जारी करण्यात आली आहे. सखल भागात आणि पूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. लहान ओढे किंवा नद्यांच्या पात्राजवळ वाहने नेणे आणि पूल ओलांडणे टाळावे. आपत्कालीन मदत, माहिती किंवा हवामान विभागाच्या फ्लॅश फ्लड सेलशी थेट संपर्कासाठी ०११-२४३४४३२८ या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
विदर्भ, मराठवाड्यात पुढील 24 तासांत 'फ्लॅश फ्लड'चा इशारा:नदी-नाल्यांना अचानक पूर येण्याची शक्यता; हवामान विभागाचा अलर्ट