Headlines

पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रकरण:'युनिव्हर्सिटी'पासून दलालांपर्यंत चौकशी करा, रोहित पवार यांची मागणी




पुणे विद्यापीठातील बनावट पदवी प्रकरणाची ‘युनिव्हर्सिटी’पासून दलालांपर्यंत सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एका बनावट पदवीचे प्रकरण समोर आले असले तरी अशा अनेक पदव्या विकल्या गेल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. पवार यांनी आरोप केला की, बनावट पदवीचा प्रकार महिनाभरापूर्वीच समोर आला होता आणि गायकवाड यांनी कुलगुरूंना पत्र दिले होते. मात्र, महिनाभर कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणात मुखेकर याला अटक झाली असली तरी, मुखेकर २०१६ पासून विद्यापीठात कार्यरत असल्याने २०१५ पासूनच्या सर्व नोंदींचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली. मुखेकरच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास व्हावा, अशी मागणी पवार यांनी केली. विद्यापीठातील भरती प्रक्रियेत ‘एज्युकेट’ आणि ‘एडुटेक’ या दोन कंपन्यांचा सहभाग असून त्यांचे भाजपशी संबंधित व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, भाजप कार्यकर्ते राजेश पांडे यांची विद्यापीठाच्या परिसरात वारंवार उपस्थिती का असते, याचीही चौकशी व्हावी, असे ते म्हणाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली. कुलगुरूंना पुढील तपासासाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नेट-सेट पात्र उमेदवारांना डावलून भाजपच्या विचारसरणीशी संबंधित व्यक्तींना नियुक्त्या दिल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी उमेदवारांकडून एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केला. या आरोपांवर पाटील यांनी स्पष्टीकरण न दिल्यास त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. यावेळी रोहित पवार यांनी अभिजित दीपके यांच्या आंदोलनावरूनही टीका केली. २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि भाजप कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. दीपके यांना भाजपमध्ये घेऊन ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. याव्यतिरिक्त, एकनाथ खडसे, त्यांच्या सून आणि मुलीविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या दोन भाजप नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भाजप खासदार हिना गावित यांच्याशी संबंधित ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी ईडीने करावी, अशी मागणीही पवार यांनी केली. अन्य मुद्द्यांवरही भाष्य

दिल्लीतील सीजेपी आंदोलनातील पोलिसांच्या कारवाईबाबत राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांशी आपण सहमत असल्याचे पवार यांनी सांगितले. तुकाराम मुंढे चांगले काम करीत आहेत; मात्र जंक फूडवर कारवाई करण्यापूर्वी शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई करावी, असे ते म्हणाले. कंगना रणौत यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेत जनतेला त्यांचे वर्तन माहीत असल्याचे पवार म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली नाही, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा कशी ठेवायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *