![]()
अलीकडच्या काळात २० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये स्तनातील गाठी आढळण्याचे प्रमाण वाढले आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यातील बहुतांश गाठी कर्करोगाच्या नसतात, तरीही स्तनात जाणवणाऱ्या कोणत्याही नव्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुजाता राजपूत यांनी केले आहे. डॉ. राजपूत यांच्या मते, पूर्वी स्तनातील गाठींची समस्या प्रामुख्याने वयोवृद्ध महिलांमध्ये दिसून येत होती. मात्र, आता २०, ३० आणि ४० वर्षांच्या वयोगटातील महिलाही स्तनाशी संबंधित तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येत आहेत. बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोन्समधील असंतुलन, उशिरा होणारी गर्भधारणा, कुटुंबातील स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास तसेच महिलांमध्ये वाढलेली जागरूकता ही या वाढत्या प्रमाणामागील संभाव्य कारणे आहेत. प्रत्येक आठवड्याला २५ ते ४५ वयोगटातील सुमारे १० पैकी ३ महिला स्वयं स्तन तपासणी करताना किंवा दैनंदिन काम करताना स्तनात गाठ जाणवल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात येतात. या गाठींपैकी अनेक गाठी फायब्रोअॅडेनोमा, सिस्ट, हार्मोन्समधील बदल किंवा संसर्गामुळे निर्माण झालेल्या असतात आणि त्या कर्करोगाशी संबंधित नसतात. तरीही, स्तनात सतत जाणवणारी गाठ, स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात बदल, स्तनाग्रातून स्त्राव होणे, त्वचेवर खड्डा पडणे, स्तनाग्र आतल्या दिशेने ओढले जाणे किंवा काखेत सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक इमेजिंग चाचण्यांद्वारे गाठीचे कारण शोधता येते आणि गरज असल्यास वेळीच उपचार सुरू करता येतात. अनेक तरुण महिलांना असे वाटते की या तरुण वयात त्यांना स्तनाचा कर्करोग होऊ शकत नाही, हा एक गैरसमज आहे. यामुळे त्या डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करतात. स्तनात जाणवलेली कोणतीही नवीन गाठ काही आठवडे कायम राहिल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. स्तनांविषयी जागरूक राहणे, नियमित स्वयं स्तन तपासणी करणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि ज्या महिलांना धोका अधिक आहे त्यांनी नियमित तपासणी करून घेणे, यामुळे स्तनाचा कर्करोग असल्यास तो सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतो. वेळीच उपचार केल्यास महिलांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते. प्रत्येक महिलेने नियमित स्वयं स्तन तपासणी करावी, कोणताही असामान्य बदल जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, वजन नियंत्रणात ठेवावे, नियमित व्यायाम करावा आणि कुटुंबात स्तनाच्या कर्करोगाचा वैद्यकीय इतिहास असल्यास डॉक्टरांना त्याची माहिती द्यावी. प्रत्येक गाठ ही कर्करोगाचीच असते असे नाही, मात्र प्रत्येक गाठीची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे.वेळेत निदान झाल्यास गंभीर आजार टाळतात येतो, अनावश्यक भीती कमी होते आणि आवश्यक उपचार त्वरित सुरू करता येतात.
Source link
तरुणींमध्ये स्तनातील गाठींचे प्रमाण वाढले:दुर्लक्ष करू नये, वेळेत तपासणी करणे गरजेचे – डॉ. सुजाता राजपूत