![]()
४११ फाउंडर्स क्लब हा अवघ्या सहा महिन्यांत पुण्यातील एक प्रमुख आणि वेगाने वाढणारा उद्योजक समुदाय म्हणून उदयास आला आहे. या व्यासपीठावर आतापर्यंत ७ हजारांहून अधिक उद्योजकांनी नोंदणी केली आहे. आठ विशेष ‘फाउंडर्स एडीशन्स’च्या माध्यमातून ६०० हून अधिक उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग नेते आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक एकत्र आले आहेत. देवयानी पवार आणि पवन रोचवानी यांनी उद्योजकांमध्ये विश्वास, अनुभवांची देवाणघेवाण आणि मुक्त संवाद साधण्यासाठी ४११ फाउंडर्स क्लबची स्थापना केली. पारंपरिक नेटवर्किंगच्या पलीकडे जाऊन, उद्योग उभारताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी, महत्त्वाचे निर्णय, अपयश आणि त्यातून मिळालेले धडे यांवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या समुदायात प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप संस्थापक, वाढीच्या टप्प्यातील उद्योजक, व्हेंचर कॅपिटलद्वारे समर्थित स्टार्टअप्स, पारंपरिक उद्योगांचे प्रतिनिधी, दुसऱ्या पिढीतील उद्योजक, गुंतवणूकदार, ऑपरेटर्स आणि क्रिएटर्स यांचा समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, फिनटेक, एडटेक, उत्पादन, डी-टू-सी, कन्झ्युमर ब्रँड्स, आरोग्यसेवा, अॅग्री-टेक, हवामान, रिअल इस्टेट, मीडिया, मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन आणि शाश्वत विकास यांसारख्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व येथे आढळते. गेल्या सहा महिन्यांत, चितळे बंधूंचे इंद्रनील चितळे, काइनेटिक समूहाच्या आरझू अलीम फिरोदिया, प्राची शेवगावकर (कूल द ग्लोब), सिद्धांत भालिंगे (उगाओ), सायली मराठे (हाऊस ऑफ आद्या), आदित्य गणेशवाडे (अटेन्क्स जिम), कबीर काटे (सॉलिटेरिओ डायमंड्स), ओंकार जाधव (अमुक तमुक), हर्षिता शोरवाला (केक डिओर) आणि सिद्धार्थ महाडिक (ले प्लाझिर) यांसारख्या अनेक नामांकित उद्योजकांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. देवयानी पवार यांनी सांगितले की, उद्योजकांना भेटीगाठींसाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध असली, तरी व्यवसाय उभारताना येणाऱ्या खऱ्या आव्हानांवर मनमोकळा संवाद साधण्याची संधी फार कमी मिळते. गेल्या सहा महिन्यांत हजारो उद्योजकांनी नोंदणी करून या समुदायाचा भाग बनण्याचा निर्णय घेतला, हीच अशा व्यासपीठाची गरज अधोरेखित करणारी बाब आहे.” स्पर्धेपेक्षा सहकार्याची भावना वाढीस लागावी, यासाठी ४११ फाउंडर्स क्लबने विविध क्षेत्रांतील उद्योजक, ऑपरेटर्स आणि क्रिएटर्स यांना एकत्र आणले आहे. उद्योग उभारणीतील प्रत्यक्ष अनुभव, यश-अपयशातून मिळालेले धडे आणि व्यावहारिक मार्गदर्शन एकमेकांशी शेअर करण्यावर या उपक्रमात भर दिला जात आहे, असे देवयानी पवार यांनी नमूद केले. याउपक्रमाच्या पुढील टप्प्यात फाउंडर्स लॅब आणि लेगसी टेबल हे दोन नवे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. फाउंडर्स लॅब अंतर्गत यशस्वी कंपन्यांच्या उभारणीमागील निर्णय, आव्हाने, कार्यसंस्कृती आणि संस्थापकांचा प्रवास उलगडला जाणार आहे.तर लेगसी टेबल या उपक्रमातून भारतातील नामांकित उद्योग घराण्यांच्या दोन-तीन पिढ्यांमध्ये उद्योजकता, नेतृत्व, उत्तराधिकार,नवकल्पना आणि कौटुंबिक मूल्यांवर मुक्त चर्चा घडवून आणली जाणार आहे,अशी माहिती देवयानी पवार यांनी दिली.
Source link
411 फाउंडर्स क्लब:सहा महिन्यांत 7 हजार उद्योजकांची नोंदणी, पुण्यातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योजक समुदाय