![]()
शिवना ग्रामपंचायतीच्या तिजोरीत दरवर्षी विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो. ई-ग्रामस्वराज्य प्रणालीवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या उत्पन्नासह तब्बल ४ कोटी १० लाख ५९ हजार २८३ इतका निधी जमा झाला होता. यापैकी जलनिस्सारण, गटार व नालेसफाई, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा दुरुस्ती, ड्रेनेज वर्क, अंगणवाडी व सार्वजनिक स्वच्छतागृह सफाई यांसारख्या कामांवर २ कोटी १२ लाख ८५ हजार ४८६ रुपये खर्च झाल्याची नोंद असली तरी ग्रामपंचायतीसमोरच पाणी साचत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच परिसरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून ऐतिहासिक वेशीजवळील मुख्य रस्त्यावर आणि थेट ग्रामपंचायतीच्या समोरच गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी साचले आहे. या साचलेल्या घाण पाण्यातून लहान शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज कसरत करत वाट काढावी लागत आहे. सुमारे २० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात कोट्यवधी रुपये खर्चूनहीसमस्या कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. काँग्रेसचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ॲड. निलेश काळे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की स्वच्छतागृह सफाई, अंगणवाडी दुरुस्ती व पाणीपुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली अधिकृत पुरवठादार किंवा कंत्राटदार नसलेल्या व्यक्तींच्या नावाने धनादेश वटवण्यात आले आहेत. एकाच कामाची वेगळी व्हाऊचर्स तयार केली गेली आहेत. त्यामुळे लेखापरीक्षणकरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शिवना ग्रामपंचायतीने गतवर्षी ‘ई-ग्रामस्वराज’नुसार स्वतःच्या उत्पन्नासह तब्बल ४ कोटी १० लाख रुपयांचा निधी प्राप्त केला. यापैकी नालेसफाई, अंतर्गत रस्ते आणि स्वच्छतेच्या नावाखाली २ कोटी १२ लाख रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. तरीही ऐतिहासिक वेशीसमोर आणि ग्रामपंचायतीच्या दारातच दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील अनेक नागरिक, विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र, गावाच्या वेशीबाहेर पावसाचे पाणी साचत असल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे. नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे ः प्रशासक या अस्वच्छतेच्या समस्येबाबत शिवना ग्रामपंचायतीचे प्रशासक डॉ. सलमान म्हणाले, स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाची कामे केली जातात. मात्र, अनेक नागरिक घरातील कचरा थेट नाल्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकतात, ज्यामुळे गटारी तुंबून परिसर पुन्हा अस्वच्छ होतो. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
Source link
विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची कसरत:शिवना येथील ग्रामपंचायतीसमोरच पावसामुळे दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे