![]()
जिल्हाभरात बुधवारी रात्रभर १५.५ मिलिमीटर पाऊस झाला. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.८ मिलिमीटर पाऊस झाला तर शहरात दिवसभरात १६.७ मिलिमीटर पाऊस झाला. तसेच अकोट तालुक्यात ११.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ ते ४८ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. तसेच पूर्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भात सध्या मान्सून सक्रिय आहे. पूर्णा प्रकल्पात गुरुवारी सकाळी पाणीपातळी ४५०.०९ मीटरवर पोहोचली असून, उपयुक्त पाणीसाठा २७.११२४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ७६.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे तीन दरवाजे गुरुवारी सकाळी १० वाजेपासून २० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात ४८.०१ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णा मध्यम प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला असून रात्रीही पाऊस सुरूच होता. शुक्रवारी सुद्धा हवामान विभागाने जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गत आठ दिवसांच्या खंडामुळे खरिपातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. बुधवार रात्रीपासून पावसाने सुरुवात केल्यामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही पावसाअभावी दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्यामुळे अनेक गावांसह शहरांमधील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ १७.२६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अकोला शहराला पाणीपुरवठा होतो. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर अकोट, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा, अकोला, बार्शीटाकळी व बाळापूर तालुक्यात पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. चार दिवस असा राहणार पाऊस शुक्रवारी, ३१ जुलै जिल्ह्यात सर्वत्र मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होऊ शकते. तसेच शनिवारपासून पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल. बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. शनिवारसाठी कोणतीही विशेष चेतावणी देण्यात आलेली नाही. रविवारी, २ ऑगस्ट व सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Source link
पिकांना नवसंजीवनी:दिवसभरात 31 मिमी पाऊस; पूर्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा