![]()
अक्कलकोटच्या विकासासाठी अवघ्या २४ तासांत प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पहिल्या टप्प्यातील ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची (डीपीआर) तयारी पूर्ण करून तो तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश म्हाडा प्रशासनाला दिले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अक्कलकोटनंतर आता बार्शी तीर्थक्षेत्र विकासाच्या आशा उंचावल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असिमकुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय दि. २९ जुलै, गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. या निर्णयानंतर एकाच दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विकास आराखडाही राबवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढत्या भाविकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन आणि परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. ही अक्कलकोटसाठी ऐतिहासिक बाब आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट
Source link
स्वामी समर्थ मंदिराचा विकास:अक्कलकोट कॉरिडॉरचा 500 कोटींचा आराखडा सादर करा : फडणवीस