![]()
कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक स्थिती यापलीकडे जाऊन माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा विचार आजही तेवढाच सुसंगत आहे. या विचारांना केवळ अभिवादन करण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी करण्याचा संस्थेचा निर्धार अधिक महत्त्वाचा ठरतो असे विचार आमदार सई डहाके यांनी येथे व्यक्त केले. कारंजा येथील श्री संत रविदास फाउंडेशनचे उद्घाटन व प्रथम कार्यारंभ म्हणून आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मंगळवारी १४ एप्रिल रोजी येथील नूतन सांस्कृतिक भवन मध्ये श्री संत रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गुरु रविदास विश्व महापिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव धाडवे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक पंजाबराव नायक, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर, सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हादराव पानझाडे, मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पांडुरंग गव्हाळे हे उपस्थित होते. दरम्यान उपस्थित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे, उपाध्यक्ष खुशाल राजगुरे, सचिव महादेव अंबाळकर, कोशाध्यक्ष मधुकरराव सोनटक्के, सदस्य कैलास ठोसरे, गजानन राजगुरे, ज्ञानेश्वर अंबाळकर, बाबाराव वानखडे, रविंद्र इंगळे यांनी उपस्थित अतिथींचे अतिथींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलताना आमदार डहाके म्हणाल्या की, समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था या लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतात. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ने सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेत जागरूकता, एकजूट आणि सकारात्मकता निर्माण केली, तर ती खऱ्या अर्थाने परिवर्तनाची वाहक ठरेल. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात सामाजिक बांधिलकी ही अनेकदा दुय्यम ठरताना दिसते. व्यक्तिकेंद्री विचारसरणीच्या वाढत्या प्रभावामुळे सामूहिक हिताच्या संकल्पना मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी चर्मकार समाजातील काही सजग कार्यकर्ते पुढाकार घेत समाजासाठी संघटीत पणे कार्य करण्याचा निर्णय घेतात, ही बाब निश्चितच आश्वासक आहे. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’च्या स्थापनेतून हाच सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित होतो. पंजाबराव नायक, प्रल्हादराव पानझाडे यांनीही आपले विचार मांडले. ज्ञानेश्वर घुडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन फाउंडेशनचे सचिव महादेव अंबाळकर यांनी केले तर उपाध्यक्ष खुशाल राजगुरे यांनी आभार मानले. संस्थेतपुरते मर्यादित नको आजचा हा कार्यक्रम केवळ एका संस्थेच्या उद्घाटनाची औचित्य नाही तर समाज जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विचार प्रवाहाचा आरंभ आहे असे ते म्हणाले. वसंतराव धाडवे यांनी कारंजा नगरीत सुरू झालेले हे नवे दालन केवळ एका संस्थेतपुरते मर्यादित न राहता व्यापक सामाजिक चळवळीचे रूप धारण करेल अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
Source link
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा:संत रविदास फाउंडेशन सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी- आमदार सई डहाके