Headlines

उत्पन्न लपवणे पतीला महागात; पत्नी-मुलाला 40 हजार पोटगी:पुणे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय; समान जीवनमानाचा अधिकार अधोरेखित




पुणे कौटुंबिक न्यायालयाने उत्पन्नाची माहिती लपवणाऱ्या पतीला मोठा दणका दिला आहे. पत्नी उच्चशिक्षित असून स्वतः चांगले उत्पन्न मिळवत असली तरी, तिला पतीच्या आर्थिक व सामाजिक दर्जानुसार समान जीवनमान जगण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार, पत्नी आणि मुलासाठी दरमहा एकूण ४० हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. एन. रुक्मे यांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम २४ अंतर्गत दाखल अर्जावर हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पतीने (नाव बदलले आहे) पत्नीच्या (नाव बदलले आहे) विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर पत्नीने स्वतःसाठी आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाच्या शिक्षण व संगोपनासाठी दरमहा ७० हजार रुपयांच्या अंतरिम पोटगीची मागणी केली होती. पतीने आपण बेरोजगार असून भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर उदरनिर्वाह करत असल्याचा दावा केला. तसेच, पत्नी आयटी क्षेत्रात कार्यरत असून तिला दरमहा सुमारे १.१७ लाख रुपये वेतन मिळत असल्याने पोटगीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, नोकरी सुटल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे सादर करण्यात तो अपयशी ठरला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्पन्न व मालमत्तेचे प्रतिज्ञापत्रही त्याने दाखल केले नाही. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने पतीविरुद्ध ‘प्रतिकूल निष्कर्ष’ काढला. पतीने मासिक उत्पन्न सुमारे ३.५० लाख रुपये असल्याचा पत्नीने केलेला दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. उत्पन्न लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्षकाराविरुद्ध प्रतिकूल निष्कर्ष काढणे कायद्याच्या चौकटीत योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने पत्नीला दरमहा २० हजार रुपये आणि मुलाच्या शिक्षण व संगोपनासाठी स्वतंत्र २० हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपये अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचे आदेश दिले. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकरणात पत्नीच्या वतीने ॲड. मयूर साळुंके, ॲड. अजिंक्य साळुंके, ॲड. अमोल खोब्रागडे आणि ॲड. पल्लवी साळुंके यांनी बाजू मांडली. उत्पन्न लपवणाऱ्या पक्षकारांविरोधात हा निर्णय मार्गदर्शक ठरणार असून कौटुंबिक न्यायालयांतील अशा प्रकरणांसाठी महत्त्वाचा संदर्भ मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *