![]()
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळेत अमनोरा येस फाउंडेशनने उभारलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सिटी ग्रुपचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संकुलामध्ये व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि बास्केटबॉलसाठी स्वतंत्र मैदाने तसेच एक सुसज्ज बंदिस्त प्रेक्षागृह समाविष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी हे संकुल उभारण्यात आले आहे. या आश्रम शाळेची स्थापना भय्यूजी महाराज यांनी केली होती. २०१४ मध्ये श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट आणि अमनोरा येस फाउंडेशनने या शाळेची जबाबदारी स्वीकारली. सध्या खामगाव येथील या आश्रम शाळेत पारधी समाजातील सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत या उद्देशाने इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, मोटर मेकॅनिक आणि ब्युटी पार्लर यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या ‘स्वयंसिद्ध’ उपक्रमांतर्गत जुन्या साड्यांपासून विद्यार्थिनी आकर्षक कापडी पिशव्या तयार करतात. प्रत्येक पिशवीमागे विद्यार्थिनींना २५ रुपये मानधन दिले जाते. या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात १० हजार रुपये जमा झाले असून, ही रक्कम ८ ऑगस्ट रोजी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रदान केली जाईल, असे देशपांडे यांनी सांगितले. अमनोरा येस फाउंडेशन अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे. ग्रामीण भागातील गरजू मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबरोबरच अनेक विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक आधार दिला आहे. रिक्षाचालकाची मुलगी डॉक्टर, अंगणवाडी सेविकेची मुलगी आयटी अभियंता आणि भाजी विक्रेत्याची मुलगी शासकीय अधिकारी बनल्याची उदाहरणे आहेत. याव्यतिरिक्त, नर्सिंगच्या ४० विद्यार्थिनींना ११ लाख रुपयांची ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’ देण्यात आली आहे. तसेच, ससून रुग्णालयातील मावश्या आणि ताईंना गेल्या आठ वर्षांपासून ‘मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार’ प्रदान केला जात आहे.
Source link
खामगावच्या आदिवासी आश्रम शाळेत उभारले अत्याधुनिक क्रीडा संकुल:सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या हस्ते होणार उद्घाटन