![]()
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार असल्याने एका दिवसातच या निवडणुकीचा फैसला होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीचे महत्त्व यासाठीही वाढले आहे की, विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे या जागा भरणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचे गणित रंगू लागले आहे. विद्यमान परिस्थितीत भाजपला पाच, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादीला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते असल्यामुळे या निवडणुकीत समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर महायुतीने अधिक उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला, तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय डावपेच आणि मतांची जुळवाजुळव सुरू राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक दिग्गज पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवार निवडताना पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या दृष्टीने पाहिले तर भाजपकडे 131 आमदार, शिवसेना (शिंदे गट) 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40 असे मिळून महायुतीचे एकूण संख्याबळ 234 आहे. तर महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 असे मिळून 49 आमदार आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून काही मते आहेत, ज्यांचा परिणाम अंतिम निकालावर होऊ शकतो. एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा महत्त्वाचे म्हणजे, विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. या गणितानुसार महायुतीचे किमान आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असे चित्र दिसत आहे. तर महाविकास आघाडीला एक जागा निश्चित मिळण्याची शक्यता असून दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त दहा मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता राजकीय शक्तीपरीक्षेचे रणांगण ठरणार आहे.
Source link
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान त्याच दिवशी निकालही:महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राजकीय गणित तापलं