![]()
दिल्लीत अभूतपूर्व आंदोलन उभे करून थेट धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारी ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता सरकारच्या रडारवर आली आहे. ‘नीट’ पेपरफुटीविरोधात उभारलेल्या या आंदोलनाची आणि त्यात ‘जेन झी’ तरुणाईने घेतलेल्या सक्रिय सहभागाची जगभरात चर्चा झाली. मात्र, या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीला मिळणाऱ्या विदेशी देणग्यांची आता सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. राज्य सरकार आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी कारवाई सुरू केल्याने नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की, “सीजेपीसह राज्यातील इतर काही संस्थांना मिळणाऱ्या परदेशी देणग्यांची चौकशी सुरू झाली आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग आणि केंद्रात ‘ईडी’कडून ही सखोल तपासणी केली जात असून, या संस्थांचे बँक खाती आणि आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत.” कठोर कारवाईचा इशारा “कायदेशीर मार्गाने परदेशातून देणगी मिळवणे यात काहीही गैर नाही. परंतु, जर या पैशांचा वापर देशात मुद्दाम अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्यासाठी किंवा चुकीच्या कामांसाठी केला जात असेल, तर संबंधितांवर निश्चितच कठोर कारवाई होईल,” असा रोखठोक इशाराही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. अभिजीत दीपके यांचे सडेतोड उत्तर सरकारने चौकशीचा ससेमिरा मागे लावल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. तपास यंत्रणांच्या या चौकशीवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके यांनी थेट यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवले. ते म्हणाले, “जर आम्हाला खरोखरच परदेशातून देणग्या मिळत असतील आणि त्याचा या देशात चुकीचा वापर केला जात असेल, तर हे थेट गृहमंत्रालयाचेच सर्वात मोठे अपयश आहे.” अभिजीत दीपके यांच्या या विधानामुळे आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुढे काय? सीजेपी अडचणीत की सरकार तोंडावर आपटणार? सीजेपीच्या आंदोलनाची नुसती भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चा झाली. आता या चौकशीच्या माध्यमातून सरकार खरोखरच सीजेपीच्या परदेशी देणग्यांचे काही धागेदोरे उघड करणार, की केवळ दबावतंत्राचा भाग म्हणून ही कारवाई होत आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या चौकशीतून काही निष्पन्न होऊन सीजेपीच्या अडचणी वाढणार, की ठोस पुरावे न मिळाल्याने सरकारच तोंडावर आपटणार, हे पाहणे आता अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे. हे ही वाचा… एकनाथ शिंदेंच्या नेत्यांकडून अभिजित दिपकेंची भेट:भाजपकडून नाराजी व्यक्त, प्रवीण दरेकर म्हणाले – महायुतीत वितुष्ट वाढू शकते ‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर, आता त्यांच्या घरी राजकीय नेत्यांची रांग लागली आहे. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अभिजित दिपके यांची घेतलेली भेट सत्ताधारी महायुतीमध्ये खळबळ माजवणारी ठरली आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी दिपकेंची भेट घेतल्याने भारतीय जनता पक्षाने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिंदे सेनेच्या दोन्ही नेत्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केलीये. सविस्तर वाचा…
Source link
कॉकरोज जनता पार्टीच्या अडचणी वाढणार?:विदेशी फंडिंगची ईडीकडून चौकशी सुरू; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती