![]()
शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विनोद कांबळे व डॉ. सुभाष पोटभरे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजी यादव हे होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. विनोद कांबळे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे जीवनवादी, वास्तववादी आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे. त्यांच्या लेखणीतून शोषित, वंचित, कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या वेदना प्रभावीपणे व्यक्त झाल्या असून अन्याय व विषमताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांच्या साहित्याने समाजाला दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या साहित्याची मूलभूत मूल्ये आहेत. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कादंबऱ्या, कथा, लोकनाट्य आणि पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी उपेक्षित घटकांना दिलेला आवाज व सामाजिक परिवर्तनातील साहित्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गांधी बाणायत यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. तुकाराम गावंडे यांनी केले. या सोहळ्यास डॉ. विलास महाजन, डॉ. उत्तम जाधव, प्रा. सचिन कदम, सतीश वाघ, डॉ. विठ्ठल देखणे, मुरलीधर जीने, वैभव राऊत, श्रीकांत चिंचखेडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रहितासाठी समर्पित जीवनाची प्रेरणा टिळकांच्या कार्यातून मिळते प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष पोटभरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, राष्ट्रभक्तीची प्रेरणा, शिक्षण, पत्रकारिता तसेच सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली जनजागृती यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रहितासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा टिळकांच्या कार्यातून मिळते, असे त्यांनी सांगितले.
Source link
अण्णा भाऊंच्या साहित्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची चेतना निर्माण केली- कांबळे:अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन