![]()
गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनगाव बारी परिसरातील वडगाव (जिरे) येथील रायधोळ नदीला मोठा पूर आला होता. या पुरामुळे वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल तसेच स्मशानभूमीकडे जाणारा शेतकऱ्यांचा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, पादचारी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्यावरही परिणाम झाला आहे. तसेच स्मशानभूमीकडे जाणारा हा एकमेव मार्ग बंद झाल्याने अंत्यविधीसारख्या अत्यावश्यक कामांमध्येही अडथळे निर्माण होत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. परिसरातील सुमारे १५० शेतकऱ्यांची शेते याच भागात असल्याने त्यांच्यासाठी हा पूल जीवनवाहिनी होता. परंतु आता त्यांना बराच वळसा घेऊन आपापल्या शेतांमध्ये जावे लागते. शेताकडे जाणारा मजूरवर्ग, शेतातून आणली जाणारी पिके, आदी सर्व वाहतूक याच मार्गाने करावी लागते. त्यामुळे यंत्रणेने याकडे तातडीने लक्ष देऊन पुलाचे बांधकाम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. याच पुलावरून मालखेडलाही जावे लागते. त्यामुळे अंजनगाव बारी, बडनेरा, वडगाव आदी ठिकाणांहून मालखेडला जाणाऱ्यांचीही गैरसोय झाली आहे. एवढेच काय, गावच्या स्मशानभूमीकडे जाणारा हाच मार्ग असल्याने मेल्यानंतरही हाल होतील की काय, अशी साधार भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक वाट न पाहता हा रस्ता पूर्ववत करावा. विशेष म्हणजे तो दरवर्षी तुटणार नाही, याची काळजी घेऊन तो योग्य पद्धतीने बांधावा, असे अंजनगाव बारी, मालखेड, वडगाव (जिरे) येथील नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षभरातच वाहून गेला पूल; मजबूत पुल हवा यापूर्वीही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र यंदाच्या पुरात तो पुन्हा वाहून गेल्याने कायमस्वरूपी मजबूत पुलाची गरज अधोरेखित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पूल व रस्त्याची दुरुस्ती करावी. भविष्यात कायमस्वरूपी मजबूत पुलाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी सरपंच धनश्याम ब्राह्मणे यांनी केली आहे.
Source link
पुरामुळे मालखेड-वडगावातील पुल गेला वाहून; ग्रामस्थ त्रस्त:नागरिकांची गैरसोय, तत्काळ दुरुस्ती करण्याची केली मागणी