Headlines

कन्नड औट्रम घाटातील भुयारी मार्ग मार्गी लावा:व्यापारी, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचे प्रकल्प संचालकांना निवेदन‎




कोट्यवधी रुपये खर्च करून दक्षिण व मध्य भारताला जोडणारा सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग साकारण्यात आला. मात्र, गेल्या नऊ वर्षांपासून कन्नड औट्रमघाटातील भुयारी मार्ग रखडलेला आहे. आता तारीख पे तारीख न देता हा भुयारी मार्ग तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीसह व्यापारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे निमंत्रक इंजि. मिलिंद लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, डॉ. दिलीपसिंग राजपूत, खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने आणि माणिकआबा पगारे यांच्या शिष्टमंडळाने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक मनीष मानकर यांना हे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केले आहे की, २०२१ मध्ये सोलापूर ते तेलवाडी आणि धुळे ते चाळीसगाव रस्ता पूर्ण झाला. मात्र, केवळ कन्नड औट्रमघाटातील भुयारी मार्गाचे काम न झाल्याने या मार्गावरील दळणवळण ठप्प आहे. घाटात सतत होणारी वाहतूक कोंडी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे न्यायालयाने जड वाहनांना बंदी घातली आहे. करोडी ते तेलवाडी रस्त्यासाठी साडेपाचशे कोटी खर्च झाले तरी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भुयारी मार्ग प्रलंबित राहिला आहे. याशिवाय, मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खचलेला रस्ता, अपूर्ण पुलांची कामे आणि तोडलेल्या हजारो देशी वृक्षांऐवजी केवळ शोभेची झुडपे लावल्याबद्दल तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. भुयारी मार्ग त्वरित सुरू करावा, रस्त्याचे पॅचवर्कऐवजी नवीन लेअर टाकावे, बंद पथदिवे सुरू करावेत आणि रस्त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. हे काम सुरू न झाल्यास महामार्गावर सत्यनारायण महापूजा घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सूर्यकांताताई गाडे, कृषीभूषण डॉ. सीताराम जाधव, डॉ. सदाशिव पाटील, योगेश खोसरे, अर्जुन पाटील, रत्नाकर पंडित आदी उपस्थित होते. ५.५ किमी भुयारी, ३.५ किमी पुलाच्या कामाला मंजुरी बजेटमुळे काम प्रलंबित होते. आता टीबीएम तंत्रज्ञानाद्वारे ३ हजार कोटी रुपये खर्चाच्या ५.५ किमी भुयारी आणि ३.५ किमी पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. वन खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळताच सप्टेंबर पर्यंत कामाला सुरुवात होऊन ५ वर्षांत काम पूर्ण होईल. तसेच तोडलेल्या झाडांच्या बदल्यात ऑक्सिजन देणारी झाडे लावली जातील, असे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक मनीष मानकर यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *