Headlines

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा:तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; आरोपी फरार




देशभरात राम मंदिरातील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच, आता महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या घटनेमुळे धार्मिक संस्था आणि देवस्थानांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला असून, भक्तांच्या श्रद्धेशी खेळ खेळला गेल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 60 कोटींहून अधिकचा गैरव्यवहार, मुख्य आरोपी फरार कोल्हापूर येथील या प्रसिद्ध बाळूमामा देवस्थान समितीमध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून, हा मंदिरांमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी देवस्थानच्या तत्कालीन उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच मुख्य संशयित रागिणी खडके या फरार झाल्या आहेत. तसेच, तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांचाही या घोटाळ्यात मोठा सहभाग असल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांनी केल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी देवस्थान समितीमध्ये झालेल्या 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या गैरव्यवहाराला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घोटाळ्याचे गांभीर्य आणि मोठी आर्थिक उलाढाल लक्षात घेता या प्रकरणाचा पुढील तपास तात्काळ ‘आर्थिक गुन्हे शाखे’कडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. विश्वस्त आणि कंत्राटदारही रडारवर धर्मादाय आयुक्त देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या फिर्यादीत देवस्थान समितीच्या तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके आणि सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) यांच्यासह संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि काही मध्यस्थांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांनी जाणीवपूर्वक संगनमत करून आणि कट रचून देवस्थानची तसेच भाविकांची विश्वासघाताने फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले असून, तपास यंत्रणांकडून आता या सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *