![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने योगायोगाने भेट झाली. याप्रसंगी रोहित पवार यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन मुंबईतील प्रलंबित प्रकल्पांचा प्रश्न उपस्थित केला. गेल्या 5 ते 10 वर्षांपासून रखडलेले प्रकल्प आणि रहिवाशांना न मिळालेले घरभाडे या गंभीर समस्या त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच याप्रकरणी एसआरए कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मुंबईतील एसआरए प्रकल्पांशी संबंधित लोकांचे विविध प्रश्न आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडले. यावेळी त्यांनी आरक्षित जागांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत एसआरएच्या कारभारावर ताशेरे ओढले. कोणताही प्रकल्प सुरू होताना तिथे खेळाचे मैदान किंवा बागेसाठी काही जागा आरक्षित ठेवलेल्या असतात. मात्र, एसआरए कार्यालयातील मिटकर आणि पाटील या दोन कार्यकारी अभियंत्यांनी एसटीपीसाठी (STP) आरक्षित असलेली जमीन बेकायदेशीररीत्या परस्पर बिल्डरच्या घशात घातल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. विशेष म्हणजे, न्यायालयाने गेल्या फेब्रुवारी महिन्यातच या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, उलट यापैकी पाटील हे अधिकारी कोणतीही कारवाई न होताच निवृत्तही झाले आहेत, ही धक्कादायक बाब त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांना 10 दिवसांचा ‘अल्टीमेटम’ न्यायालयाचे आदेश असूनही अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने, या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी रोहित पवार यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आम्ही हीच कारवाईची मागणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यासाठी रोहित पवार यांनी संबंधित आयुक्तांना 10 दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला असून, या मुदतीत योग्य ती पावले न उचलल्यास पुढील भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. पवार आणि ठाकरेंची अचानक भेट मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयात आज आमदार रोहित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांची योगायोगाने भेट झाली. हे दोन्ही नेते आपापल्या वेगवेगळ्या कामांसाठी या कार्यालयात आले होते. या अनपेक्षित भेटीदरम्यान त्यांच्यात एसआरएच्या रखडलेल्या प्रकल्पांबाबत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रलंबित कामे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाशी चर्चा केली. रोहित पवारांनी विशिष्ट मुद्द्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले यावेळी रोहित पवार यांनी काही विशिष्ट मुद्द्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वरळी येथील अट्रिया मॉलजवळील नाल्याला लागून असलेल्या जागेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 10 हजार चौरस फुटांच्या या जागेची सध्याची किंमत तब्बल 5 हजार कोटी रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीची जागा ताब्यात घ्यावी आणि तेथील रहिवाशांचे इतरत्र योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही रोहित पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Source link
मुंबईतील एसआरए कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची भेट:SRA कारभारावर रोहित पवारांचे ताशेरे, प्रलंबित प्रकल्पांवरून प्रशासनाला धरले धारेवर