![]()
अमरावती जिल्ह्यात मका आणि ज्वारीच्या सरकारी खरेदीसाठी १० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मागणी होती. या केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आगामी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केंद्रे मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, वरुड, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या १० तालुक्यांमध्ये सुरू होतील. संबंधित तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयातच ही खरेदी प्रक्रिया राबवली जाईल. राज्य पणन महासंघाचे संचालक नितीन हिवसे, काँग्रेसचे खासदार बळवंतराव वानखडे आणि चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या केंद्रांच्या स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेतली होती. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच खरेदी सुरू केली जाईल. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची तयारी केली आहे. ठिकठिकाणचे खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जिनींग-प्रेसींग युनिट्समार्फतही ही सूचना संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. दरम्यान, मका आणि ज्वारीच्या खरेदीपूर्वी शासनाने तूर आणि हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, बारदाण्याच्या (पोत्यांच्या) कमतरतेमुळे सध्या त्या ठिकाणची खरेदी थांबली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार वानखडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयावर धडक देऊन बारदाना तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. बारदाना न मिळाल्यास शेतकरी आपली तूर आणि हरभरा कार्यालयात आणतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
Source link
अमरावती जिल्ह्यात 10 ठिकाणी मका, ज्वारीची सरकारी खरेदी सुरु:शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन