Headlines

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर पदाधिकारी आपसामध्ये भिडले:कल्याणच्या नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी दिला राजीनामा




कल्याण-ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अंतर्गत गटबाजी आणि नाराजीचे नाट्य उघडकीस आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत “मातोश्री’वर पार पडलेल्या आढावा बैठकीत ठाणे व कल्याणचे पदाधिकारी आपापसात भिडले. या राजकीय गदारोळातच कल्याण लोकसभेच्या माजी उमेदवार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या जिल्हा महिला संघटकपदाचा अचानक राजीनामा दिल्याने ठाणे-कल्याण पट्ट्यात ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्ह्यातील संघटनात्मक पुनर्बांधणी आणि नवीन तसेच जुन्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत रणनीती ठरवण्यासाठी मातोश्रीवर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच कल्याण विभागातील काही पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून बैठकीदरम्यान जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त होणारे कार्यकर्ते आमनेसामने आले. बघता बघता दोन्ही गटांत जोरदार शाब्दिक चकमक उडाली व वातावरण तापले. आपापसामध्ये भांडत आहात? तुमच्या या वागण्याला काही अर्थ आहे का: उद्धव ठाकरे आपल्याच डोळ्यांसमोर चाललेला हा प्रकार पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत संतापले. त्यांनी पदाधिकाऱ्यांना फैलावर घेत कडक शब्दांत कानउघाडणी केली. “अभिजित दिपकेसारखा एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून देशात थेट पंतप्रधान मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही इथे क्षुल्लक कारणांवरून आपापसात भांडत आहात? तुमच्या या वागण्याला काही अर्थ आहे का?’ असा थेट सवाल करत ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला व उपस्थित पदाधिकाऱ्यांना समज दिली. त्यानंतर हा वाद काहीसा शमला. मात्र, येणाऱ्या काळात ही खदखद आणखी वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. कल्याण लोकसभा महिला संघटक दरेकरांनी श्रीकांत शिंदेंविरोधात निवडणूक लढली होती मातोश्रीवरील या राजकीय नाट्यानंतर लगेचच कल्याण लोकसभा जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या दरेकर-राणे यांनी वैयक्तिक कारणास्तव पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याचे राजीनाम्यात नमूद केले आहे. त्या प्राथमिक सदस्य म्हणून पक्षात कार्यरत राहणार असल्या तरी ऐन संघटनात्मक पुनर्बांधणीच्या काळात उफाळलेला हा वाद आणि दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे-कल्याण क्षेत्रात ठाकरे गटासमोर मोठा संघटनात्मक पेच निर्माण झाला आहे. ठाकरे गटातील फुटीरता व अंतर्गत वादाच्या प्रमुख 7 घडामोडी 1. जून 2022 (ऐतिहासिक बंड): एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार आणि 13 खासदारांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले व शिवसेनेत मोठी फूट पडल्याचे राज्याने पाहिले. 2. ऑक्टोबर 2022 (स्थानिक वाद): अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान स्थानिक संघटनात्मक असमन्वयामुळे वाद निर्माण झाला, ज्यावर मातोश्रीवरून थेट मध्यस्थी करावी लागली. 3. फेब्रुवारी 2023 (चिन्ह गमावल्यानंतर निदर्शने): निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांचा मातोश्रीबाहेर गोंधळ झाला होता. 4. नोव्हेंबर 2024 (मातोश्री क्लब राडा): निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीतील मातोश्री क्लबबाहेर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट हाणामारी व दगडफेक झाली. 5. जून 2025 (नेत्यांचे राजीनामे): पक्षश्रेष्ठी सहज उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. 6. जून 2026 (खासदारांची दुसरी मोठी फूट): ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गटाची मागणी करत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. 7. 30 जून 2026 (सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश): आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय व आमदार सचिन अहिर यांनी 30 जून 2026 रोजी ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला व विधान परिषद उपसभापतिपदाचा अर्ज भरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *