![]()
बागलाण तालुक्यातील जायखेडा–बिजोटे हा महत्त्वाचा मार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून नव्या रस्त्याची मागणी होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. जायखेडा ते सटाणा जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता आणि खड्डा यातील फरक ओळखणेही कठीण झाले आहे. परिणामी, दुचाकी घसरणे, चारचाकी वाहनांचे नुकसान होणे आणि अपघातांची संख्या वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. चिखल, पाणी आणि खड्ड्यांमधून मार्ग काढत शाळेत जावे लागत असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही विद्यार्थी घसरून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या मार्गावर अवलंबून असलेल्या शेतात जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्याने जायखेडा- बिजोटे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने आतापर्यत १० ते १२ जणांना दुखापती झाल्या आहेत. – बबन भामरे, शेतकरी शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजीपाला, दूध व अन्य कृषीमाल वेळेत बाजारात पोहोचवणे कठीण झाले असून, खराब रस्त्यामुळे वाहतूक खर्च आणि वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा तक्रारी करूनही संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक पावसाळ्यात तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र कायमस्वरूपी रस्ता करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जीवितहानीची जबाबदारी प्रशासनावरच रस्त्याच्या नव्या कामास तातडीने मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांनी दिला आहे. भविष्यात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांवर राहील, असा संतप्त इशाराही नागरिकांनी दिला आहे. पावसाळ्यानंतर काँक्रिटीकरण केले जाणार ^जायखेडा – बिजोटे या रस्त्यावरील मंगल कार्यालयाजवळ असलेला रस्त्याचे पावसाळ्यानंतर क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू करणार आहोत. रस्ता सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी काही काळ सहकार्य कारावे. – जगदीश सपकाळे, शाखा अभियंता, सा. बा. विभाग
Source link
जायखेडा- बिजोटे रस्ता खड्ड्यात; दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास:नागरिकांचा संताप अनावर; रस्ता दुरुस्तीसाठी आंदाेलनाचा इशारा