Headlines

दर्जेदार सेवा देण्यासाठी उपकेंद्रांची गुणवत्ता महत्त्वाची- दिलीप दोडके:महावितरणच्या जणूना विद्युत उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय आएसओ मानांकन‎




जिल्ह्यातील बडनेरा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या ३३/११ केव्ही जणूना विद्युत उपकेंद्राचे सक्षमीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले आहे. उपकेंद्रात झालेल्या सर्व सुधारणा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार झाल्यामुळे या उपकेंद्राला ‘आयएसओ 9001:2015′ हे मानांकन देवून सन्मानित करण्यात आले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना सीई दोडके म्हणाले की, विद्युत उपकेंद्राची गुणवत्ता थेट ग्राहक सेवेशी निगडित असते. ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात ग्राहकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जणूना उपकेंद्रातील सुधारणा आंतरराष्ट्रीय मानकावर झाली असून, ही संपूर्ण परिमंडळासाठी अत्यंत कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. अधीक्षक अभियंता दिपक देवहाते म्हणाले की, ​जिल्ह्यातील आयएसओ मानांकन मिळवणारे हे महावितरणचे दुसरे विद्युत उपकेंद्र ठरले आहे. यापूर्वी याच उपविभागातील ३३ केव्ही लोणी (टाकळी) या उपकेंद्राला ऑक्टोबर २०२४ मध्ये हे मानांकन मिळाले होते. विभागातील इतर अभियंता व कर्मचाऱ्यांनी यातून प्रेरणा घेत आपल्या कार्यक्षेत्रात सुधारणा कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे, अमित बुटे, राजेश माहुलकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने आणि उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ३३ केव्ही जणूना उपकेंद्रातून ‘एअर इंडिया’ या अत्यंत महत्त्वाच्या ग्राहकासोबत ग्रामीण भागातील १५ उद्योग, चोरी माऊली गावठाण वाहिनीवरील ग्राहक, जणूना कृषी आणि सावनेर कृषी अशा ५ फिडरच्या माध्यमातून ग्राहकांना वीजपुरवठा केला जाणार आहे. ​उपकेंद्राच्या सक्षमीकरण आणि नूतनीकरणासाठी उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, सहाय्यक अभियंता सुदाम पाकधाने, वरिष्ठ यंत्रचालक संजय कांबळे, यंत्रचालक महेश जाधव, रोशन डकरे, कमलेश श्रृंगारे आणि स्थानिक सुरक्षा रक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जवंजाळकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुदाम पाकधाने यांनी मानले. आयएसओ हे मानांकन कोणत्याही संस्थेला अथवा कंपनीला तिच्या गुणवत्तेचा दर्जा, सेवा आणि कार्यक्षम व्यवस्थापन पद्धतींच्या आधारावर दिले जाते. हे मानांकन मिळण्यासाठी संस्थेतील सर्व कामे आणि व्यवहार ठराविक, पारदर्शक व लिखित नियमांनुसार पार पडणे आवश्यक असते. त्यासोबतच कंपनीची उत्पादने किंवा सेवा आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या असाव्या लागतात. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्या तक्रारींचे योग्य निवारण करण्याची सक्षम यंत्रणा असणे हेदेखील मानांकनाचा महत्त्वाचा आधार आहे. तसेच, व्यवसायात सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत सुधारणा करणे अनिवार्य मानले जाते. या सर्व निकषांची योग्य पूर्तता झाल्यानंतर त्रयस्थ संस्थेकडून सखोल कायदेशीर तपासणी केली जाते, आणि त्या निष्कर्षांच्या आधारावरच हे मानांकन प्रदान केले जाते. ‘आयएसओ’ मानांकनाचा आधार : तक्रारींचे योग्य निवारण करण्याची सक्षम यंत्रणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *