![]()
बिहारमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. एका पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाणाऱ्यांनी आधी नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही कसा पराभव झाला, हे विसरू नये, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि राज्यात लागू झालेला नवा ‘धर्म स्वातंत्र्य कायदा’ यावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. ‘दोन्ही ठाकरे एकत्र लढले अन् तोंडावर आपटले’ आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले, “एका पोटनिवडणुकीतील पराभवामुळे या लोकांना खूप आनंद झाला आहे. पण नुकतीच जी बेस्टची निवडणूक झाली, ती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन लढले होते. तरीही ते तिथे तोंडावर आपटले आणि हरले. मग आता मराठी माणसाने यांना लाथ मारून बाहेर काढले, हकलवून लावले, असे आम्ही म्हणायचे का?” असा संतप्त सवाल राणे यांनी उपस्थित केला. राणे पुढे म्हणाले, “आम्ही जनमताचा नेहमीच आदर करतो. पण काही महिन्यांपूर्वी बंगालमध्येही भाजपचे सरकार आले, तिथे आमचा मुख्यमंत्री बसला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःची वरळी सांभाळावी. २०२९ ची निवडणूक तुम्हाला खूप अवघड जाणार आहे.” ‘कोणताही जिहादी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही’ राज्यात नव्याने लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचे’ नितेश राणे यांनी जोरदार स्वागत केले. यावर बोलताना ते म्हणाले की, “आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिंदू समाजाला एक विश्वास दिला होता की, लव्ह जिहादसारखे प्रकार थांबवण्यासाठी आम्ही कडक कायदा आणू. आज हा कायदा मंत्रिमंडळात आणि अधिवेशनात पास होऊन त्यावर माननीय राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे. या कायद्यात एवढी ताकद आहे की, आता राज्यामध्ये कुणीही जिहादी आमच्या हिंदू माता-भगिनींकडे लव्ह जिहादच्या नावाने वाकड्या नजरेने बघू शकणार नाही.” जरांगेंबाबत सरकारची सकारात्मक भूमिका मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील येत्या ७ ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. यावर बोलताना मात्र नितेश राणे यांनी भूमिका स्पष्ट केली. “मनोज जरांगे पाटील आणि आमच्या सरकारमध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. त्यांच्या मनात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत बसून नक्कीच मार्ग काढू. शेवटी ते समाजाचेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हीही मराठा समाजाचे आहोत आणि आमच्या मुला-मुलींचे प्रश्न सुटले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या होत्या, पुढेही चर्चा करून यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. हेही वाचा.. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके अडचणीत?: मारहाणीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार; तातडीच्या अटकेची मागणी, नेमकं प्रकरण काय? सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले असून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा राज्यात पावसाचा जोर ओसरला:घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
दोन्ही ठाकरे एकत्र लढले, तरी बेस्ट निवडणुकीत पराभूत झाले:आदित्य ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर