![]()
जिल्ह्याचे वरदान ठरलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरण ७७.३२ टक्के भरले आहे. जुलै महिन्यात लाभक्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे मुळा धरणाची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळे राहुरी शहरासह धरणावर अवलंबून असलेल्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता निर्माण झाली होती. तसेच खरीप हंगामातील पिकांबाबतही शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण होते. त्यामुळे सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. मात्र जुलै महिन्यात निसर्गाने साथ दिल्याने मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणात २०.१०५ टीएमसी पाणीसाठा नोंदवण्यात आला. दुपारी तीन वाजता कोतूळकडून धरणाकडे ११,१५२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. लाभक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि अशीच आवक सुरू राहिल्यास मुळा धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे. धरण भरल्यानंतर मुळा नदीपात्रात विसर्ग सुरू होण्याची तसेच मुळा डावा व उजवा कालव्यातून खरीप आणि रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा वाढत असताना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. तालुक्यातील दोन्ही लोकप्रत निधींना वांबोरी चारीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय हालचालीही सुरू झाल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा रिमझिम पावसाने उघडीप दिल्याने मुळा उजवा आणि डावा कालवा क्षेत्रातील अनेक भागांतील खरीप पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आता वाढत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग पाणीवाटपाचे धोरण कसे ठरवतो, याकडे संपूर्ण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Source link
मुळा धरण 77.32 टक्क्यांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित:लाभक्षेत्रात पावसाची साथ; कालव्यांना पाणी सोडण्याची मागणी तीव्र