![]()
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांनी केले आहे. त्यांनी सर्व सहाय्यक निबंधकांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘ॲग्रीस्टॅक’ काढलेले नाहीत, त्यांनी ते तात्काळ काढून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय कर्ज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. जिल्ह्यात सध्या 8,749 शेतकऱ्यांकडे ‘ॲग्रीस्टॅक’ नसल्यामुळे त्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही. यामध्ये दौंड (1,126), इंदापूर (1,232), भोर (1,031), खेड (931), मावळ (795), शिरूर (645), जुन्नर (641), बारामती (608), हवेली (599), पुरंदर (524), आंबेगाव (229), वेल्हे (176), मुळशी (134) आणि पुणे (78) या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 9,382 शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे ‘ॲग्रीस्टॅक’ असूनही त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामध्ये दौंड (1,597), इंदापूर (1,461), बारामती (922), भोर (900), हवेली (821), पुरंदर (755), खेड (640), शिरूर (616), जुन्नर (464), मावळ (373), वेल्हे (338), पुणे (291), आंबेगाव (136) आणि मुळशी (68) येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व सहाय्यक निबंधकांना त्यांच्या तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब शेतकरी कर्जमुक्तीशी संबंधित असल्याने कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
Source link
पुणे जिल्ह्यात 8,749 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी:कर्जमुक्ती योजनेसाठी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन, जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन