बिहारमधील पोटनिवडणुकीच्या निकालांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंदोत्सव साजरा केल्याने भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. “शेजारच्या घरात लेकरू झाल्यानंतर पेढे वाटण्याचा प्रकार संजय राऊत करत आहेत. आपला पक्ष वांझोटा
.
दुसऱ्याच्या घरात लेकरू, राऊत वाटतायत पेढे
बिहारमधील पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाने मिळवलेल्या यशावर संजय राऊत यांनी समाधान व्यक्त करत भाजपवर टीका केली होती. याला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत ज्या काँग्रेस, जेडीयू आणि राजदची गुलामी करतात, त्या सर्वांचा बिहारमध्ये पराभव झाला आहे. इंडिया आघाडी तिथे पूर्णपणे हरली आहे. तरीही राऊत आनंद साजरा करत आहेत. गेल्या 4-5 वर्षांत ठाकरे गटाला सर्वच निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने त्यांना सेलिब्रेशनची संधीच मिळाली नव्हती. त्यामुळे दुसऱ्याच्या घरात लेकरू झाल्यावर ते आता पेढे वाटत आहेत.”
महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला 0 जागा मिळाल्या होत्या, याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. एका निवडणुकीतील पराभवाने नरेंद्र मोदी संपले, असा निकष जर राऊत लावत असतील, तर महाराष्ट्रात लोकसभा वगळता सर्वच निवडणुकांत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे, मग त्यांचा पक्ष संपला असे राऊत मान्य करणार का? असा सवालही बन यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीचे सरकार हीच खरी गुंडांची आणि दरोडेखोरांची टोळी
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाला ‘गुंडांची टोळी’ म्हणणाऱ्या संजय राऊतांचा नवनाथ बन यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “खरी गुंडांची टोळी अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना अस्तित्वात होती. रोज 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट देणे, निवृत्त अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, केतकी चितळे आणि निखिल भामरे यांना केवळ सोशल मीडिया पोस्टवरून तुरुंगात डांबणे, कंगना रनौतचे घर पाडणे आणि पालघरमध्ये साधूंचे हत्याकांड झाल्यावर गप्प बसणे, याला गुंडांची टोळी म्हणतात.”
याउलट, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि मेट्रो यांसारखी विकासाची कामे झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ठाकरे सरकारने जनमताचा कौल नाकारून महाराष्ट्रावर दरोडा टाकला होता, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
रोहित पवारांना टोला- काठावर पास झालेल्यांनी मेरीटवर येणाऱ्यांवर बोलू नये
ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावरही नवनाथ बन यांनी पलटवार केला. “निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाला आपला प्रतिनिधी (BLA-2) नेमण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, रोहित पवार यांच्याकडे आता माणसेच उरलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीत ते स्वतः कसेबसे काठावर पास झाले आहेत. ज्यांच्याकडे बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख नाहीत, त्यांची आता चिडचिड होत आहे. भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ‘मेरीट’वर पास केल्या आहेत, त्यामुळे ‘ढकलपास’ झालेल्या रोहित पवारांनी आमच्यावर टीका करू नये,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
2019-20 मधील लुटीची चौकशी होणार
मुंबई पोलिसांमध्ये बनावट पोलीस भरती करून तब्बल 6 कोटी 50 लाख रुपयांचे वेतन लाटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यावर बोलताना नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, हा प्रकार 2019 आणि 2020 च्या काळातील आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतील आणि जे कोणी दोषी असतील, त्यांची गय केली जाणार नाही.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना बन म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे, यावर महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये शिक्कामोर्तब केले आहे. ठाकरे गट हा केवळ काँग्रेस आणि राहुल गांधी यांची ‘बेनामी शाखा’ बनून राहिला आहे.
गुंगी गुडिया आणि काँग्रेस
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेला उत्तर देताना, काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंग यांनी 10 वर्षे ‘मौनी बाबा’ म्हणून कसे काम केले आणि राहुल गांधींनी संसदेत कायदा कसा फाडला, याची आठवण बन यांनी करून दिली. विजय वडेट्टीवार यांच्या ओबीसी उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर बोलताना बन म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळातच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. भाजपने कायम ओबीसींना न्याय दिला असून आज मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते महत्त्वाच्या पदांवर आहेत.
हेही वाचा…
बांकीपूरमधील पराभव म्हणजे मोदी-भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचे उदाहरण:संजय राऊतांसह पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवारांचा निशाणा

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा तब्बल 30 वर्षांचा गड ढासळल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे. हा पराभव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या घसरत्या लोकप्रियतेचा पुरावा असून, मतदारांना गृहीत धरल्याची ही शिक्षा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी