Headlines

पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; 32 दुचाकी, 24 मोबाइल जप्त:वाहनचोरीचे 24 गुन्हे उघड, 7 आरोपींना अटक




पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनचोरी विरोधात मोठी मोहीम राबवत दोन स्वतंत्र कारवाईत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ३२ दुचाकी आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, एकूण २४ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २० लाख ८५ हजार रुपये आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या कारवाईत ज्ञानेश्वर शंकरराव जैसवाल (वय ४६, रा. आळंदी देवाची) आणि वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय ३५) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे वाकड, आळंदी, चाकण, संत तुकाराम नगर, शिक्रापूर तसेच रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीस ठाण्यांमधील १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपआयुक्त प्रदीप जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विदल साळुंखे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. दुसऱ्या एका कारवाईत, बावधन पोलिसांनी मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात अनिल लहु जाधव (वय २०), वसंत अंबुशा जाधव (वय २५), सुनील लहु जाधव (वय २५) या तीन सराईत चोरट्यांसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली आणि २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे यांच्या पथकाने म्हाळुंगे-नांदे रस्त्यावर गस्त घालत असताना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरील दोघांना अडवून चौकशी केली. या तपासात बावधन, हिंजवडी आणि शिरगाव-परंदवडी परिसरातून केलेल्या सात वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. जप्त केलेल्या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, दोन्ही प्रकरणांमध्ये पुढील तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *