![]()
राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी आज काळ्या फिती लावून आंदोलन पुकारले आहे. बीएचएमएस-सीसीएमपी धारक डॉक्टरांना ॲलोपॅथी सरावासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) नोंदणी देण्याच्या सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला त्यांचा तीव्र विरोध आहे. महाराष्ट्र सिनिअर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (एमएसआरडीए) या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवला असून, सेंट्रल मार्ड आणि इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. या निषेधाचा भाग म्हणून, राज्यभरातील सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टर आपापल्या कार्यस्थळी काळ्या फिती लावून शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. रुग्णांची सुरक्षा आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. नॅशनल मेडिकल कमिशनच्या (एनएमसी) निकषांनुसार परिपूर्ण शिक्षण व कडक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांनीच ॲलोपॅथीचा सराव केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन करून ‘क्रॉस प्रॅक्टिस’ला परवानगी देणे रुग्णांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाचा अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, सरकारने ही नोंदणी प्रक्रिया तत्काळ स्थगित ठेवावी, अशी मुख्य मागणी डॉक्टरांनी केली आहे. तसेच, कायदेशीर चौकटीबाहेर जाऊन असा कोणताही जीआर किंवा प्रशासकीय आदेश जारी करू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. हा लढा कोणत्याही वैद्यकीय शाखेविरुद्ध नसून, केवळ वैज्ञानिक मानके जपण्यासाठी असल्याचे एमएसआरडीएचे अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी सांगितले. सरकारने याप्रकरणी सर्व घटकांशी चर्चा करून निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
Source link
वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे आज काळ्या फिती लावून आंदोलन:BHMS-CCMP नोंदणीला तीव्र विरोध; सरकारच्या निर्णयावर आक्षेप