![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणातून (नाथसागर जलाशय) आज, मंगळवार (4 ऑगस्ट) सायंकाळी गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरण नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान धरणाच्या सांडव्याद्वारे 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार या विसर्गात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन विसर्ग सुरू होणार असल्याने गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही. गोदावरीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम, शेतकरी चिंतेत मराठवाड्यात पावसाची तूट अद्यापही भरून निघालेली नाही. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. येथे पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहणार असून, हलका पाऊस आणि ढगाळ हवामान राहील. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील इतर काही भागांतील शेतकऱ्यांची चिंता आता वाढू लागली आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा राज्यात पावसाचा जोर ओसरला:घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा गेले काही दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या मान्सूनने आता बहुतांश भागांत ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी उघडीप मिळाली आहे. मात्र, असे असले तरी आज 4 ऑगस्ट (मंगळवार) रोजी विदर्भातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Source link
जायकवाडी धरणातून आज सायंकाळी 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग:गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा