![]()
अमृता फडणवीस यांनी बालविकास आणि महिला सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले आणि पर्यावरणासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना यंदाचा ‘ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते (विशेष आरोग्यसेवा), कायनेटिक ग्रीन एनर्जीच्या संस्थापिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी (उद्योजकता), भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा (क्रीडा), लोकसाहित्य आणि सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे (साहित्यसेवा) आणि सोलापूर येथील जिव्हाळा मतिमंद संस्थेचे प्रमुख अण्णाराव भिमशंकर राजमाने (शिक्षण व समाजसेवा) यांचा समावेश होता. उरी हल्ल्यातील शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांची वीरपत्नी सायली अर्जुन जाधव आणि त्यांच्या आई-वडिलांना ‘शौर्य पुरस्कारा’ने विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच, माळशिरस दुर्घटनेत पाच जणांचा जीव वाचवणाऱ्या तांदुळवाडी येथील इरफान मुजावर यांना ‘मानवतावादी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे, सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, लोकमंगल फाऊंडेशनचे विश्वस्त रोहन देशमुख, प्रसिद्ध क्रिकेटपटू तिलक वर्मा, अभिनेते चंकी पांडे आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व्यंकटेश (व्यंकी) कुडुमुला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, भारत हा केवळ जमिनीचा तुकडा नसून, तो एक राष्ट्रपुरुष आहे. युद्धात बलिदान देणारे, तसेच शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि क्रीडा यांसारख्या सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींमुळे देशाची ओळख निर्माण होते आणि त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महिला सक्षमीकरण आणि बालविकास ही दोन्ही क्षेत्रे समाज आणि शासनाकडून काही प्रमाणात दुर्लक्षित आहेत आणि यावर मोठे काम होण्याची गरज आहे. उषा काकडे यांच्यासारख्या व्यक्ती अशा प्रकारचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Source link
बालविकास, महिला सक्षमीकरणात प्रत्येकाचे योगदान गरजेचे:अमृता फडणवीस यांचे ग्रॅव्हिट्स ऊर्जा पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन