Headlines

'त्या' वादग्रस्त पोस्टशी माझा संबंध नाही!:'गुंगी गुडिया' वादावर पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले- सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील




राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या सोशल मीडियावरून त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला. या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “एका पक्षाला ही भाषा शोभते का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का?” असा सवाल करत दमानिया यांनी थेट चव्हाण यांना फोन करून विचारणा केली. या संपूर्ण प्रकारानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करत त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या वाढत्या वादानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, आज सकाळी दिल्लीत असताना अंजली दमानिया यांचा मला फोन आला होता. त्यांनी या पोस्टबद्दल आक्षेप नोंदवला असता, मी त्यांना याविषयी माहिती घेतो असे सांगितले. तसेच, या वादग्रस्त पोस्टशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्या विरोधात विनाकारण आंदोलने केली जात असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. कोणावरही आरोप करण्यापूर्वी किंवा आंदोलन करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी आधी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बीड मधील एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियाची ती टिपणी होती, अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते, मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे, एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा. पण, त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अनुत्तरीत राहते. त्याला मुख्यमंत्री/गृहमंत्री हे संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा गेली बारा वर्षे अत्यंत काळजीपूर्वक जोपासली आहे. त्यांचे महिलांच्या बद्दलचे उदगार – ‘50 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य जगजाहीर आहेत. पण कॉंग्रेसची वेगळी परंपरा आहे. कॉंग्रेसने नेहमीच देशात राजकारणाची पातळी सांभाळायचे काम केले आहे. सुनेत्रा पवारांच्या कृतीतून उत्तर मिळेल तसेच अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबतीत केला होता. पण इंदिराजींनी त्यांना कृतीने उत्तर दिले. सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात कार्यरत असून राज्याच्या एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांबहलत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थातच त्यांच्याकडूनही कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *