Headlines

परिचारिकांचे दोन तास 'काम बंद' आंदोलन:सुधारित सेवा नियम आणि पदोन्नतीसाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने




अमरावती येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली परिचारिकांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दोन तास ‘काम बंद’ आंदोलन केले. सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी आणि क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. परिचारिकांच्या सुधारित सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध आणि पदोन्नती यांसारख्या महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत. शासनाने जाहीर केलेल्या ‘१५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाची’ मुदत २ ऑक्टोबर २०२५ रोजीच संपली असली तरी, या प्रश्नांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित आहेत. रुग्णालयांमध्ये रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून, याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलकांनी शासनाकडे तातडीने सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम करण्याची, सुधारित आकृतीबंधास त्वरित मान्यता देण्याची, सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची आणि रिक्त पदांवर सरळ सेवा भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. या आंदोलनात संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष वर्षा पागोटे यांच्या नेतृत्वात विद्या चुडे, नलिनी पिंजरकर, पूनम खडसे, दुर्गा घोडीले, विद्या भुसारी, सपना वार्ड, साधना ठाकूर, प्रफुलता खडसे, जयश्री मोरे, मेघा चौबे, नीतू श्रीखंडे, साधना भोरे यांसह अनेक परिचारिका आणि संघटना प्रतिनिधी सहभागी झाले होते. फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष इंदुमती थोरात आणि राज्य सरचिटणीस विशाल सोनार यांनी इशारा दिला आहे की, शासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास भविष्यात याहून अधिक तीव्र आंदोलन केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *