Headlines

एनएचएमच्या कायमस्वरूपी यादीवर 224 तक्रारी:काही कर्मचाऱ्यांची नावे, तारखा, पात्रता चुकीची; 8 ऑगस्टला अंतिम यादी




राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत दीड हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ५२५ जणांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर सुमारे २२४ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट उमटणे, नेमणूक तसेच खंड कालावधीच्या तारखा चुकीच्या असणे आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती अपूर्ण असणे अशा त्रुटींचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी एनएचएम कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांची दखल घेऊन एनएचएम कार्यालयाने यादी नव्याने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. ही सुधारित यादी पूर्ण झाल्यावर राज्य शासनाकडे पाठवली जाईल. राज्य शासनाने यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. राज्य शासनाने आरोग्य विभागासाठी समांतर यंत्रणा म्हणून एनएचएमची स्थापना केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात शिपाई, पट्टीबंधक, परिचारिका, समुपदेशक ते डॉक्टरांपर्यंत दीड हजाराहून अधिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षय रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्यवर्धिनींमध्ये हे कर्मचारी सेवा देतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी कंत्राटी नियुक्तीच्या विरोधात राज्यभर आंदोलने करत होते. या आंदोलनांचा परिणाम म्हणून, १० वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नव्या भरतीमध्ये ३० टक्के आरक्षण देऊन कायम करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निकषानुसार ५२५ कर्मचारी कायम होण्यास पात्र ठरले आहेत. त्यांच्या नोकरीच्या एकूण कालखंडाचे तपशील शासनाकडे पाठवले जात आहेत. डीएचओ कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीतील तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली होती, त्यानुसार २२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या हरकती व सूचनांवर योग्य निर्णय घेऊन ७ ऑगस्ट रोजी अंतिम यादी (हार्ड व सॉफ्ट कॉपी) जाहीर केली जाईल. त्यानंतर, ८ ऑगस्ट रोजी ही यादी खास दूतामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई येथील आरोग्य भवनातून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *