![]()
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागातर्फे दरमहा आयोजित करण्यात येणारे जिल्हास्तरीय मासिक कृषी चर्चासत्र एरंडोल तालुक्यातील मौजे उंमरे येथे प्रगतिशील शेतकरी समाधान पाटील यांच्या शेतावर मोठ्या उत्साहात पार पडले. या चर्चासत्रात आधुनिक शेती, जलसंधारण, फलोत्पादन, आंतरपीक पद्धती, प्रक्रिया उद्योग तसेच शेतीपूरक व्यवसायांवर उपस्थितांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. चर्चासत्राच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी आणि मान्यवरांनी समाधान पाटील यांच्या शेतातील विविध प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यामध्ये मोसंबी बागेतील कलिंगड, कोबी, वांगे, चवळी, झेंडू आदी आंतरपिके, ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे आणि जलसंधारणासाठी उभारलेल्या साखळी बंधाऱ्याची पाहणी करून पाण्याचे जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी केले, तर आभार सहाय्यक कृषी अधिकारी कुंदन पाटील यांनी मानले. उमरे येथे कृषी मासिक चर्चासत्राल उपस्थित विविध मान्यवर. या प्रसंगी तहसीलदार गोपाळ पाटील, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव गंभीरे, मंडळ कृषी अधिकारी अरविंद शिवदे, कृषी अधिकारी निखिल तोळकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. श्यामकांत हिरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अनिल शिंदे, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय डॉ. अतुल पाटील, कृषी उपसंचालक भरत इंगळे, वनश्री पुरस्कार प्राप्त संदीप माळी, युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त मल्हार पाटील व विनोद बोरसे, उद्यान पंडित प्रवीण पाटील, प्रगतिशील शेतकरी शालिग्राम गायकवाड यांच्यासह कृषी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना जळगाव जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी नवीन पिकांची लागवड करावी. मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय यांसारखे शेतीपूरक व्यवसाय स्वीकारावेत आणि कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून ती निर्यातक्षम बनवावीत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने बायोमेट्रिक ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन केले.
Source link
शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ई-केवायसी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन:उमरे येथे पार पडले जिल्हास्तरीय मासिक कृषी चर्चासत्र